सांगली : माधवनगर चप्पल गोदामास आग

लाखोंचा माल खाक : अग्निशमनच्या दहा गाड्यांद्वारे आटोक्यात
माधवनगर चप्पल गोदामास आग
माधवनगर चप्पल गोदामास आगsakal

सांगली: माधवनगर (ता.मिरज) येथील रविवार पेठेत असलेल्या चप्पलच्या गोदामाला मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत सर्व माल जळून खाक झाला. महापालिका व तासगाव नगरपालिकेच्या १० गाड्यांनी तीन ते चार तासांत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीमध्ये प्राथमिक तपासात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पूर्ण चौकशीनंतर आगीतील नुकसानीचा नेमका आकडा समजू शकेल.

आगीबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, कोल्हापूरजवळील गांधीनगर येथे राहणारे अनिल दयाराम मखिजा यांची भारत सेल्स कॉर्पोरेशन नावाने कंपनी आहे. त्यांच्या कंपनीकडे पॅरागॉन कंपनीच्या चप्पलची एजन्सी आहे. मोठ्या प्रमाणात माल ठेवण्यासाठी श्री. मखिजा यांनी माधवनगर येथील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ श्री. लुंकड यांच्या मालकीचे पाच हजार चौरस फुटांचे प्रशस्त गोदाम भाडयाने घेतले आहे. बुधवारी काम

आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्री साडेसात वाजता गोदाम बंद करून ते गावी निघून गेले.

मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास अचानक त्या गोदामातून धूर आणि आगीचे लोट उठू लागले. सुरक्षारक्षकाने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा करून शेजारील लोकांना जागे केले. संजयनगर पोलिस ठाणे आणि महापालिका अग्निशमन दलाला माहिती कळवली. नागरिकांनी गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून ते उघडे केले. काही मिनिटांतच महापालिकेच्या अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानी आग आटोक्यात आणण्यास सुरवात केली; परंतु चप्पलाच्या साठ्याने मोठा पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. गोदामात हवा खेळती नसल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. जेसीबी बोलवून मागील बाजूने पत्रा उचकटण्यात आला. त्यानंतर तेथूनही पाण्याचा फवारा सुरू केला.

महापालिका क्षेत्रात आणखी एका ठिकाणी आग लागल्यामुळे तासगाव नगरपालिका अग्निशमन यंत्रणेची गाडी बोलवण्यात आली. महापालिकेच्या गाड्यांनी एका पाठोपाठ एक खेपा केल्या. एकूण दहा गाड्यांनी चार तासांत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत गोदामातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, कर्मचारी राजू कदम, विजय कांबळे, दत्तात्रय पाटील, प्रशांत शिंदे, रुद्रेश्‍वर केंगार, राजू शेख, सागर भातमारे, सतीश वाघमारे आदींनी आग आटोक्यात आणली.

कारण अस्पष्ट

गोदामाला आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आग कशामुळे लागली असावी, याची चर्चा रंगली होती. संजयनगर पोलिस ठाण्यात आज उशिरापर्यंत नोंद नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com