हळद निर्यातीत अडकले 11 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

सांगली - सांगली बाजार समितीतील काही व्यापारी, अडत्यांना हळद निर्यातीत तोटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यापारी, अडत्यांचे तब्बल 11 कोटी रुपये अडकल्याची चर्चा सुरु आहे. हळदीचे मोठी रक्कम अडकल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. 

सांगली - सांगली बाजार समितीतील काही व्यापारी, अडत्यांना हळद निर्यातीत तोटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यापारी, अडत्यांचे तब्बल 11 कोटी रुपये अडकल्याची चर्चा सुरु आहे. हळदीचे मोठी रक्कम अडकल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. 

सांगलीची बाजारपेठ हळद, बेदाणा आणि गुळाची उतारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध आहे. बाजार समितीत गेल्यावर्षी सहा लाखाहून अधिक हळद पोत्यांची आवक झाली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणासह केरळ राज्यातून हळदीची आवक होते. गेल्या दोन वर्षात हळदीला सहा हजार ते नऊ हजार रुपयापर्यंत दर मिळाला. यंदा हळदीच्या पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादनात भरमसाठ वाढ झाली. बाजार समितीत हळद व्यापारी आणि अडत्यांची संख्याही मोठी आहे. हळदीची निर्यातही काही व्यापारी करतात. द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याचे प्रमाण अधिक आहे, दरवर्षी काही प्रकरणे उघडकीस येतात, मात्र हळदीच्या निर्यातीतून फसवणूक होण्याचे प्रमाण कमी आहे. 

यार्डातील व्यापारी आणि अडत्यांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याला निर्यातीसाठी हळदीची विक्री केली आहे. सुमारे 10 ते 11 कोटी रुपयांची हळद निर्यात केली होती. हळदीची विक्री करुन बरेच महिने झाले आहेत, मात्र व्यापाऱ्याकडून बील मिळालेले नाही. मुंबईतील व्यापाऱ्यांकडे पैसे मिळावेत, यासाठी व्यापाऱ्याचा सातत्याने प्रयत्न चालू आहे. मुंबईपर्यंत हेलपाटेही मारले, परंतू अद्याप रक्कम मिळाली नाही. पैसे परत मिळविण्यासाठी तेथील अन्य व्यापाऱ्यांशी मध्यस्थीचा प्रयत्न केला, परंतू संबंधित व्यापारी हळदीची रक्कम देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे मार्केट यार्डातील व्यापारी आणि अडते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दरम्यान, हळदीची विक्री तोट्याने झाली असल्याने संबंधित व्यापाऱ्यास तोटा झाला असल्याची चर्चाही दबक्‍या आवाजात सुरु आहे. 

Web Title: Sangli market committee turmeric