मनपा बगलबच्चे पोसणारी संस्था - बानुगडे पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांचे बगलबच्चे पोसणारी संस्था आहे. विकास नव्हे तर कमिशन हेच मिशन घेऊन इतकी वर्षे कारभार केलेल्यांना आता तोंड दाखवायचाही अधिकार नाही. आता पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी आज केले. 

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांचे बगलबच्चे पोसणारी संस्था आहे. विकास नव्हे तर कमिशन हेच मिशन घेऊन इतकी वर्षे कारभार केलेल्यांना आता तोंड दाखवायचाही अधिकार नाही. आता पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी आज केले. 

येथील स्टेशन चौकात शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते शिवसेना सांगली ऍपचे उद्‌घाटन आणि "भगवा फडकणारच' या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ नेते रावसाहेब घेवारे, श्री. खोचगे, युवा सेनेचे राष्ट्रीय सदस्य पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, संजय विभूते, संघटक दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने, माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील आदी व्यासपीठावर होते. 

प्रा. बाणुगडे पाटील म्हणाले, 'सांगलीचा इतिहास अफाट असला तरी वर्तमान व भविष्य धोक्‍यात आहे. इतकी वर्षे मंत्रिपदाने साथ दिल्यानंतरही सांगलीची अवस्था अशी का? कुठे आहेत उड्डाणपूल, कुठे आहे उद्योग आणि व्यापारातील विकास. पायाभूत सुविधांची स्थिती काय? प्यायला पाणी नाही, पाण्यात आळ्या आहेत, हेच कर्तृत्व. इथल्या 20 हजार नोकऱ्या गेल्या, दीड लाख तरुण पुण्यात नोकरी करतात, ही शोकांतिकाच आहे. हीच वेळ आहे बदल घडवण्याची. मुंबईसारख्या महाकाय नगरात सामान्यातील सामान्य माणसाला आधार वाटणारी शिवसेनाच या शहरात विकासपर्व घडवू शकते.'' 

पृथ्वीराज पवार म्हणाले, 'सांगलीत तीस कोटींचे रस्ते केले म्हणून छाती बडवून घेणाऱ्यांनी शिवसेनेने इथे 40 कोटींची कामे केल्याचे लक्षात ठेवावे. रस्त्याचा ढोल वाजवू नका, गुंठेवारी, खोकीधारक, भाजीवाले यांच्या प्रश्‍नांचे काय केले? शेतकऱ्यांसाठी रक्त सांडणाऱ्या इस्लामपूरच्या नेत्याला तर यावेळी नदी ओलांडून अलीकडे येऊ देणार नाही. त्यांनी राजारामबापूंचे नाव बाजूला ठेवावे, त्यांची किंमत चवलीएवढीही नाही.'' 

शेखर माने म्हणाले, 'महापालिकेतील काळ्या बाजाराला शिवसेना स्टाईलने हाणून पाडले आहे. शिवसैनिकच आता नागरिकांच्या समस्या सोडवायला पुढे सरसावले आहेत. आयुक्तांना खडसावून गैरकारभार आपण रोखला आहे. प्रभाग रचनेतील घोटाळाही उजेडात आणू.'' 

दिगंबर जाधव यांनी शिवसेना तरुणांना संधी देऊन नवीन नेतृत्व व त्यातून विकास घडवेल, अशी ग्वाही दिली. जिल्हाध्यक्ष संजय विभूते, बजरंग पाटील, अजिंक्‍य पाटील यांचे मार्गदर्शन झाले. शंभोराज काटकर यांनी प्रास्ताविक केले. अभिजित पाटील, सुनीता मोरे, तानाजी सातपुते, मयूर घोडके, महेंद्र चंडाळे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. 

शिवसेना सरकारच्या उरावर
प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, 'शिवसेनेला सत्तेची आस नाही. या सरकारच्या उरावर बसून आम्ही नियंत्रण ठेवले आहे. जेथे खोट आहे, तेथे चेहरा उघडा पाडला आहे. राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारून आता हल्लाबोल करणाऱ्यांनी त्याचे भान ठेवावे.'

Web Title: sangli miraj kupawad municipal organisation nitin banugade patil