सांगली महापालिकेचे मैदान 1 ऑगस्टला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

निवडणुक एका नजरेत 
एकूण प्रभाग 20, 
एकूण नगरसेवक 78 
मतदारसंख्या-4 लाख 23 हजार 
मतदान -1 ऑगस्ट 
मतमोजणी 3 ऑगस्ट 

सांगली : सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीचे मैदान येत्या एक ऑगस्टला असेल. या निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता आजपासूनच जाहीर झाली आहे. 4 जुलैपासून निवडणुकीची प्रक्रिया सूरु होईल. तीन ऑगस्ट मतमोजणी असेल. 

आगामी लोकसभा निवडणुकी आधीची ही सर्वात मोठी निवडणूक असल्याने या निवडणुकीतून राजकीय वातावरणाचा कल आजमावला जाणार आहे. निवडणुकीसाठी सभागृहातील विद्यमान सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधक राष्ट्रवादीत आघाडीचे स्पष्ट संकेत आहेत. विरोधात भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. 

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची एकत्रित अशी महापालिका 9 फेब्रुवारी 1998 रोजी झाली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युतीच्या सत्ताकाळात पालकमंत्री अण्णा डांगे यांच्या आग्रहाने स्थापन झालेल्या या महापालिकेवर प्रारंभपासून कॉंग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. सध्या कॉंग्रेसची सुमारे 45 सदस्यांसह महापालिकेत सत्ता असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीची यापुर्वी सत्ता होती. महाआघाडीचे बारा वाजल्यानंतर 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील, आणि पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने बहुमत मिळवत सत्ता प्राप्त केली होती. आता हे दोन्हीही नेते नाहीत. आता गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून विद्यमान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकाच्या भूमिकेत असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी आता आघाडीच्या मुडमध्ये आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वारंवार आघाडीची इच्छा बोलून दाखवली आहे. 

दुसरीकडे भाजपने स्वबळावर महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला जिल्ह्यात चार आमदारासंह खासदारांचे बळ मिळाले आहे. सांगली-मिरजेतील दोन्ही आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असेल. त्यांनी कॉंग्रेसचे महापौर विवेक कांबळे, मिरजेतील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांचा पक्षप्रवेश घडवून त्यांनी कॉंग्रेसला पहिला धक्का दिला आहे. याशिवाय दोन्ही कॉंग्रेसमधील अनेकांसाठी भाजपने जाळे टाकले आहे. येत्या काही दिवसात ही पक्षांतरे घडवून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा इरादा जाहीर केला आहे. भाजपचे राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेले शिवसेना, स्वाभीमानी आघाडी, राष्ट्रीय जनता पक्ष यांची महापालिका क्षेत्रात फारशी ताकद नाही. तथापि त्यांनी भाजपविरोधात सातत्याने इथेही सूर लावला आहे. विशेषतः शिवसेनेसोबत भाजप नेत्यांनी युतीची तयारी दर्शवूनही सेनेने स्वबळावर लढण्याचा इरादा जाहीर केला आहे. भाजपच्या वाटेत अडथळे अधिक असले तरी भाजपमध्ये यायला इच्छुकांची संख्या मोठी आहे. 

निवडणुक एका नजरेत 
एकूण प्रभाग 20, 
एकूण नगरसेवक 78 
मतदारसंख्या-4 लाख 23 हजार 
मतदान -1 ऑगस्ट 
मतमोजणी 3 ऑगस्ट 

Web Title: Sangli Miraj Kupwad Municipal Corporation election