
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला.
सांगली, मिरज, तासगावसह जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह दमदार पावसाची हजेरी
- अजीज झळके
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. उन्हाळी पिकांसाठी हा पाऊस पोषक असून द्राक्ष, ऊस व अन्य फळ पिकांनाही तो फायदेशीर आहे. उन्हाने लाहीलाही झालेली असताना दमदार पावसाने सगळीकडे वातावरण अल्हाददायक झाले.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी हवा आहे. यंदा मॉन्सून लवकर येणार, असा सांगावा आला आहे. त्यामुळे वातावरणात बदल दिसू लागला आहे. आजपासून दोन दिवस पावसाचा अंदाज होता. त्यानुसार सायंकाळी दमदार पावसाला सुरवात झाली. ढगांचा गडगडात झाला. वातावरण अंधारून आले होते. अर्धा तास दमदार पाऊस झाला. त्यानंतर काही वेळ रिपरिप सुरु होती.
उशीरापर्यंत वीजा चमकत होत्या. शहराच्या सखल भागात नेहमीप्रमाणे तळी साचली. शंभर फुटी रस्ता, भरतनगर, रामनगर परिसरासह श्यामरावनगरमध्ये रिकामे प्लॉट पुन्हा भरले. तासभर वाहतूक संथ गतीने सुरु राहिली. हा पाऊस कार्यालये सुटण्याच्या वेळेस सुरु झाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूससह ठिकठिकाणी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली.