esakal | सांगली महापालिकेचे बजेट किती कोटींचे 

बोलून बातमी शोधा

Sangli municipal budget of 675 crore

भरघोस उत्पन्नवाढीचे मार्ग सुचवणारे सांगली महापालिकेचे 2020-21चे 675 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडनीस यांनी तयार केले आहे. पुढच्या आठवड्यात स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत.

सांगली महापालिकेचे बजेट किती कोटींचे 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : भरघोस उत्पन्नवाढीचे मार्ग सुचवणारे महापालिकेचे 2020-21चे 675 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडनीस यांनी तयार केले आहे. पुढच्या आठवड्यात स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत. यात विकासाच्या योजनांवरही आयुक्‍तांनी भर दिला आहे.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. त्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कराच्या कचाट्यातून सुटलेल्यांना या चौकटीत बसवून उत्पन्नवाढीचा प्रयत्न सुरू आहे. सॅटेलाईट सर्व्हे आणि प्रत्यक्ष सर्व्हेद्वारे घरपट्टीच्या मालमत्ता सुमारे दीड लाखांपर्यंत वाढवल्या आहेत. थकबाकी वसुलीवर जोर देतानाच मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्सना घरपट्टी लावली आहे.

अग्निशमन विभागाच्या दाखल्याच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, क्‍लासेसनाही कर लावला आहे. यातूनही दोन-अडीच कोटी रुपये उत्पन्न वाढण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्न वाढवण्यासाठीही प्रयत्न चालवले आहेत. अपार्टमेंटमध्ये प्रत्येक फ्लॅटना पाणी बिलांची सक्ती केली आहे. खुल्या भूखंडांना घरपट्टी तसेच जागा भाड्याने देणे, दाखल्यांसह विविध करांचा समावेश करून सुमारे 30 कोटी रुपये उत्पन्नवाढीचे टार्गेट ठेवले आहे. 

गेल्या वर्षी बसलेल्या महापुराच्या दणक्‍याने शहराचे मोठे नुकसान झाले. त्याचा करवसुलीवरही परिणाम झाला आहे. एकूणच मागील वर्षीची करवसुली आणि नव्याने पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करताना वस्तुनिष्ठतेवर भर दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. शासन अनुदान, स्थानिक उत्पन्न असे सुमारे 675 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक झाले आहे. 

अंदाज पत्रकात ड्रेनेज, पाणी योजनांसह अपुऱ्या योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मिरज पंपिंग स्टेशन विकसित करणे, आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग समितीनिहाय दहा लाख रुपयांची तरतूद, महापालिकेचे दवाखाने अत्याधुनिक उपकरणांद्वारे सुसज्ज करण्याचा प्रस्ताव आहे. महापालिकेच्या इमारतीवर सोलर पॅनेल बसवून विजेची बचत करण्यात येईल. नवीन नाट्यगृह बांधणे, वायू प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण कृती आराखड्याचीही अंमलबजावणी करण्याचा मानस आहे. पुढील आठवड्यात हे अंदाजपत्रक महासभेत सादर करणार आहे. 

शंभरफुटीसाठी 15 कोटींचा आराखडा 
आयुक्त कापडणीस म्हणाले,""शहराचा रिंगरोड असलेला राजर्षी शाहू महाराज मार्ग (शंभरफुटी रस्ता) सुसज्ज करून पूर्ण वापरात आणण्यासाठी 15 कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. पूर्ण डांबरीकरण, विद्युत खांबांचे स्थलांतर, स्ट्रीट लाईट, रस्ता दुभाजक तसेच रस्त्याच्या दोन्ही टोकांना कारंजे करण्यात येणार आहेत. कोल्हापूर रस्त्यावरील वळणाजवळ सुसज्ज असा कारंजा व आयलॅंड उभारण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी भाजपचे नेते सुजित राऊत यांनी घेतली आहे. हा कारंजा सांगलीच्या प्रवेशद्वारातच स्वागत करणारा ठरणारा आहे.''