भाजपमध्ये अस्वस्थता; जयंत पाटील टप्प्यातील करेक्ट कार्यक्रम करणार का?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

आजच्या गटनेते निवडीनंतर भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले.

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या गटनेता व सभागृह नेतेपदी विश्रामबागमधील प्रभाग क्रमांक १९ चे नगरसेवक विनायक सिंहासने यांची निवड झाली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपच्या बैठकीत निवड करण्यात आली. दरम्‍यान निवडीनंतर भाजपमधील नाराजीनाट्य पाहावयास मिळाले.

सत्ताधारी भाजपचा गटनेता आणि सभागृह नेता निवडीसाठी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, कोअर कमिटीचे पदाधिकारी, महापौरांसह नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक झाली. शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे अध्यक्षस्थानी होते. भाजपचे माजी गटनेते युवराज बावडेकर यांचा राजीमाना दोन दिवसांपूर्वी पक्षाने घेतला. नवीन गटनेता निवडीसाठी आज आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयात बैठक झाली. 

बंद पाकिटातून नाव.. 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभागृह नेतेपदी विनायक सिंहासने यांचे नाव निश्‍चित केले. बंद पाकिटातून प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या पत्रातून सिंहासनेंचे नाव बैठकीत पाठवण्यात आले. 
शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी पाकिट उघडून सिंहासने यांचे नाव सभागृह नेता आणि गटनेता म्हणून जाहीर केले.

उपमहापौर बैठकीतून गेले
आजच्या गटनेते निवडीनंतर भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगले. निवडीच्या बैठकीत उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह काही सदस्यांनी नेत्यांवर टीका केली. बैठकीतूनही ते निघून गेले. उपमहापौर देवमाने यांच्या नेतृत्वाखाली चार-पाच नगरसेवकांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले. देवमाने म्हणाले, महापालिकेत प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. पूर्वीच्या गटनेत्यांनीही बोटचेपी भूमिका घेतली. 
उर्वरित काळासाठी तरी भाजपची सत्ता अबाधित रहावी, कामे व्हावीत यासाठी अनुभवी गटनेता निवडावा, अशी नेत्यांकडे मागणी केली होती. त्यासाठी लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, ॲड. स्वाती शिंदे आदींपैकी अनुभवी सदस्यांना संधी द्यावी. अशी मागणी होती. मात्र त्याची दखल घेतली नाही. 

ते म्हणाले, नवख्या नगरसेवकाला गटनेते केल्यामुळे प्रशासनावर कसा अंकुश ठेवणार? नगरसेवकांना न्याय मिळणार का?  कारभारात बदल झाला नाही तर सत्ताच राहणार नाही. 
भाजपला महापालिकेत सत्ता टिकवायचीच नाही. नावापुरत्या सत्तेचे आम्हाला भागीदार राहायचे नाही. त्यामुळे आम्ही पाच-सहा जण भाजपच्या सदस्यत्वाचे राजीनामे देणार आहोत. आमच्यावर हवी ती कारवाई करावी.

नवे गटनेते विनायक सिंहासने यांना पदावर बसवण्यास अनेक नगरसेवक महापालिकेकडे फिरकलेच नाहीत. यामुळे भाजपच्या नाराजी नाट्याची मोठी चर्चा रंगली. 

हे पण वाचापती-पत्नीने आयुष्याचा प्रवासही संपविला एकत्रच; भाजी विक्रेत्याच्या मृत्यू हळहळ

काॅंग्रेस राष्ट्रवातीतून पुढाकार नाही
भाजपमधील नाराजी नाट्यानंतर विरोधी पक्षातील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी पुढाकार घेणार का?अशी चर्चा होती परंतु, राष्टॅवादीतून मैन्नुद्दीन बागवान यांचे नाव महापाैर पदासाठी पुढे करताच त्यांनी पक्षातूनच विरोध झाला. काॅंग्रेसच्या वीस नगरसेवकांना ग्रृहित धरून  स्वत:च्या पंधरा नगरसेवकांच्या बळावर राष्ट्रवादीने हा पुढाकार घेतला होता. परंतु, काॅंग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर यांच्यासह पक्षातीस सर्वांनीच यावर माैन पाळले. अर्थातच काॅंग्रेसच्या थंड प्रतिसादानंतर राष्ट्रवादीचा पुढाकार मावळल्याचे दिसून आले. 

हे पण वाचा गडावरची स्टंटबाजी आली अंगलट! बेदम मारत जमिनीवर घासायला लावले नाक; मग गावकऱ्यांनी शोधला जालीम उपाय

 

जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करणार का?
  भाजपचे नाराजी नाट्य आणि काॅंग्रेसचा थंड प्रतिसाद पाहता राष्ट्रवातील सर्वांचे लक्ष आता जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करणार का यावरच आहे. परंतु, महापालिकेतील सत्ता थेट ताब्यात घेण्याएवजी राष्ट्रवादीच्या स्थानिक कारभाऱ्यांना अप्रत्यक्ष सत्तेत स्वारस्य असल्याची चर्चा आहे. काॅंग्रेसमधील काही कारभाऱ्यांचेही मत असेच आहे. महापाैरपदासाठी मोट बांधण्याएेवजी भाजपमधील दुफळीची पाट पहा असाच कल सध्या दोन्ही पक्षात आहे. 
                 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli municipal corporation jayant patil chandrakant patil