
सांगली : पाच नगरपालिकांचा आखाडा रंगणार
सांगली:आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून राज्यातील प्रलंबित निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच नगरपालिकांचा आखाडा रंगणार आहे. त्यात इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगाव आणि पलूस या पाच नगपालिकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. यापैकी तीन पालिकांवर राष्ट्रवादीची, एकावर काँग्रेसची तर एका पालिकेवर भाजपची सत्ता आहे. राज्यातील नव्या सत्ता समीकरणांमुळे आता या आखाड्यात ती समीकरणे कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विशेषतः विट्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूरच्या घराच्या मैदानावरील जुन्या पराभवाचे उट्टे काढणार का? राष्ट्रवादीचे नेते विलासराव शिंदे यांच्या पश्चात्त आष्टा त्यांच्या गटाकडे शाबूत राहणार का? भाजपला मात देऊन तासगावमध्ये राष्ट्रवादी कवठेमहांकाळची पुनरावृत्ती करणार का? आणि पलूसचा गड राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडेच राहील का?, हे मुद्दे औत्सुक्याचे असणार आहेत. भविष्यातील राज्याच्या राजकारणाची रंगीत तालीम म्हणून राज्यातील या निवडणुकांकडे पाहिले जात असल्याने हा आखाडा रंगतदार होणार आहे.
इस्लामपूर : शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात प्रस्थापित विकास आघाडी हेच लढतीचे मुख्य चित्र राहील. तूर्तास तिसऱ्या आघाडीचे कसलेही संकेत नाहीत. निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात आणखी एक प्रभाग वाढणार आहे. त्यामुळे नगरसेवक संख्येत आणखी दोघांची भर पडेल. त्यामुळे २८ ऐवजी नगरसेवक संख्या ३० होणार आहे. एक दलित प्रभागही वाढणार आहे.
गेल्या पाच वर्षांत समान बलाबल आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीत विकास आघाडीचा नगराध्यक्ष असे चित्र निर्माण झाल्याने सत्ता ही विकास आघाडीकडेच राहिली. प्रस्थापित नेते जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरल्याने यंदाही तोच प्रयत्न राहणार यात शंका नाही.
शहरात सध्या चौदा प्रभाग आणि २८ नगरसेवक आहेत. तर एक थेट नगराध्यक्ष आहे. सध्या होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवड रद्द करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार ही संख्या निर्धारित करण्यात आली आहे. इस्लामपुरात ही संख्या दोन प्रभाग आणि पाच नगरसेवकांनी वाढणार असा अंदाज होता, परंतु केवळ एकच प्रभाग आणि दोन नगरसेवक वाढले आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६७ हजार ३९१ आहे. त्यावर आधारित प्रभागरचना करण्यात आली आहे. साडेचार हजार ते पाच हजार लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. सध्या शहरात प्रभाग क्रमांक ३, ५ व १४ हे दलित प्रभाग आहेत. आता हे प्रभाग नव्या रचनेत बदलतील. आणि त्यामध्ये नव्याने आणखी एका प्रभागाची भर पडेल.
ओबीसी आरक्षण रद्दचा फटका आठ जणांना!
न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयामुळे इस्लामपूर पालिकेतील आठ जणांना फटका बसणार आहे. शहरात सध्या १४ प्रभाग आणि २८ नगरसेवक होते. त्यापैकी ८ नगरसेवक ओबीसी आरक्षणावर निवडून आले आहेत. त्यात चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. नव्या प्रभागरचनेत आणखी एक प्रभाग वाढला आहे. या प्रभागताही एखादे ओबीसी आरक्षण वाढण्याची शक्यता गृहीत धरली तर नऊ ओबीसी उमेदवारांना निवडणूक लढवता आली असती.
आकड्यांत स्थिती
लोकसंख्या - 67391
अनुसूचित जाती - 8249
अनुसूचित जमाती - 458
मतदार संख्या ः 53,642
पुरुष - 27388,
महिला - 26,254
Web Title: Sangli Municipalitiesstate Politics Painted
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..