Sangli Crime : जागेच्या वादातून महिलेचा निर्घृण खून; मायलेकासह तीन अल्पवयीन अटक

वानलेसवाडी येथील गल्ली क्रमांक आठमधील हायस्कूल रोड परिसरात एका महिलेच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर कोयता, सत्तूरसह धारदार शस्त्रांनी वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला.
Sangita Masal
Sangita Masalsakal
Summary

वानलेसवाडी येथील गल्ली क्रमांक आठमधील हायस्कूल रोड परिसरात एका महिलेच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर कोयता, सत्तूरसह धारदार शस्त्रांनी वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला.

सांगली - वानलेसवाडी येथील गल्ली क्रमांक आठमधील हायस्कूल रोड परिसरात एका महिलेच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर कोयता, सत्तूरसह धारदार शस्त्रांनी वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. संगीता राजाराम मासाळ (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. भरदुपारी बारा-सव्वाबाराच्या सुमारास संशयितांनी हत्यारे नाचवत परिसरात दहशत माजवल्याने खळबळ उडाली. दरम्यान, जागेच्या वादातून नातलगांनी हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ संशयित मायलेकासह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यातील तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शिवाजी बाळू मासाळ, लक्ष्मी बाळू मासाळ (रा. वानलेसवाडी) यांना अटक केली. याबाबत मृत संगीता मासाळ यांचे भाऊ रावसाहेब गणपती गडदे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत संगीता मासाळ यांचे पती राजाराम यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे त्या आणि त्यांचा मुलगा किरण हे दोघे वानलेसवाडी येथे राहत होते. राजाराम मासाळ यांना चार सख्खे भाऊ. त्यातील राजाराम, चंद्रकांत, शिवाजी आणि बाळू या चौघांनी वानलेसवाडी येथे ३५ वर्षांपूर्वी ८ गुंठे जागा खरेदी केली होती. त्या खरेदी केलेल्या जागेत चंद्रकांत मासाळ यांच्या नावावर एक गुंठा जागा होती. ती जागा २००१ मध्ये राजाराम यांना तीस हजारांना विकली होती. दरम्यानच्या काळात संशयित लक्ष्मी मासाळ हिने चंद्रकांत यास ती जागा परत घेण्यासाठी फूस लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे चंद्रकांत आणि राजाराम यांच्यात वाद सुरू झाला. या वेळी राजाराम यांनी जागा परत देणार नसल्याचे सांगितले.

२०११ मध्ये राजाराम यांचे निधन झाले. त्यानंतर मृत संगीता यांनी ही जागा शेजारी राहणारे यमगर यांना नऊ लाखांना विकली. मिळालेल्या पैशातून स्वतःच्या जागेत बांधकाम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चंद्रकांत यांनी न्यायालयात धाव घेत २०१५ मध्ये बांधकामास स्थगिती मिळवली. त्यावेळीपासून एकमेकांत धुसफूस सुरूच होती. चंद्रकांतसह पत्नीचा सांभाळ करू; परंतु ती जागा तुम्ही परत घ्या, असा तगदा संशयित लक्ष्मी हिने लावला. यातून अनेकदा वादावादीही झाली. एकमेकांना शिवीगाळ आणि खुन्नस देण्याच्या घटनाही घडल्या.

दरम्यान, आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मृत संगीता घरात जेवण करत असताना संशयित घरात घुसले. क्षणार्धात संशयितांनी वाद घालण्यास सुरुवात केली. संशयित लक्ष्मी हिने संगीता यास मारून टाका, असे संशयितांना उचकवले. त्यानंतर कोयता, सत्तूरने डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर सपासप वार केले. त्यात संगीता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत संगीता यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी संशयित शिवाजी मासाळ आणि त्याची आई लक्ष्मी यांना अटक केली. गुन्ह्यातील अन्य तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक संजय मोरे तपास करत आहेत.

हत्यार नाचवत दहशत

दरम्यान, संशयितांनी कोयता, सत्तूर नाचवत परिसरात दहशत माजवत पळ काढला. त्यामुळे परिसरात लोकांची एकच पळापळ झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांना यापूर्वीच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे भर दुपारी झालेल्या घटनेने विश्रामबाग परिसरात खळबळ उडाली.

वीस वर्मी वार

मृत संगीता यांच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर वीस वर्मी वार होते. एक गुंठा जागेसाठी रक्ताच्या नातलगांनी इतक्या निर्घृण पद्धतीने खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.

टोकाचे पाऊल टाकण्याची गरज काय?

मृत आणि संशयित एकमेकांचे नातलग आहेत. भावंडांनी घेतलेल्या जागेची सध्या गुंठ्याला दहा लाख रुपये किंमत झाली आहे. पैशाचा मोह आणि एक गुंठ्यासाठी इतके टोकाचे पाऊल उचलणे योग्य नाही. वास्तविक पहाता न्यायालयीन प्रकरण असताना त्याठिकाणी न्याय आणि दाद मागणे गरजेचे होते. अन्य मार्गानेही या प्रकरणावर तोडगा निघाला असता; परंतु खुनापर्यंत जाण्याची मजल का गेली, याचा शोध घेण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com