बेदाण्याच्या विक्रीतून १४ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

सांगली - येथील साई कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या ५६ लाख २५ हजार रुपये किमतीच्या बेदाण्याची परस्पर विक्री करून त्यात १४ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्टोअरेज संचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला. 

सांगली - येथील साई कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या ५६ लाख २५ हजार रुपये किमतीच्या बेदाण्याची परस्पर विक्री करून त्यात १४ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्टोअरेज संचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला. 

साई कोल्ड स्टोअरेजचे संचालक राजेंद्र लक्ष्मण कुंभार (रा. सावळी रोड) आणि इंडियन बॅंकेचे तत्कालीन शाखाधिकारी यांच्यावर कुपवाड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परगोंडा चनगौडर (वय २९, रा. खिळेगाव, ता. अथणी, बेळगाव) यांनी

याबाबतची फिर्याद दिली. कुपवाड पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार कुंभार यांचे सावळी रोडवर साई कोल्ड स्टोअरेज आहे. अनिल चनगौडर यांनी तेथे प्रत्येकी १५ किलो वजनाचे २५०० बेदाणा बॉक्‍स ठेवले होते. त्याचवेळी त्यांनी वखारभाग येथील इंडियन बॅंकेतून २५ लाखांचे कर्ज काढले होते. कुंभार यांनी एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत इंडियन बॅंकेचे तत्कालीन शाखाधिकारी यांना हाताशी धरून तक्रारदारांनी काढलेल्या कर्जापोटी ११ लाख ९५ हजारांची रक्कम बॅंकेत भरली. त्यानंतर काही दिवसांनी कुंभार यांनी चनगौडर यांना ३० लाखांचा चेक दिला. चनगौडर यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येकी १५ किलो वजन असलेल्या २५०० बॉक्‍सच्या बेदाण्याची अंदाजे १५० रुपये दराने ५६ लाख २५ हजार रुपये किंमत होते. कुंभार यांनी केवळ ४१ लाख ९५ हजार रुपयेच दिले. उर्वरित १४ लाख २५ हजार रुपये दिले नाहीत. याप्रकरणी कुपवाड औद्योगिक पोलिसांत नोंद झाली आहे. हा गुन्हा पुढील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Sangli News 14 lakh rupees cheating in sale of raisin