मुंबई मोर्चाला जिल्ह्यातून दीड लाख लोक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

बैठकांना मोठा प्रतिसाद - शनिवारी सांगली-मिरजेत मोटारसायकल रॅली  

सांगली - मुंबईत नऊ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यात सुरू झालेल्या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोर्चात जिल्ह्यातून सुमारे दीड लाखजण सहभागी होतील.  मोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. शनिवारी (ता. पाच) सांगली, मिरजेत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांच्यावतीने आज देण्यात आली.

बैठकांना मोठा प्रतिसाद - शनिवारी सांगली-मिरजेत मोटारसायकल रॅली  

सांगली - मुंबईत नऊ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यात सुरू झालेल्या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोर्चात जिल्ह्यातून सुमारे दीड लाखजण सहभागी होतील.  मोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. शनिवारी (ता. पाच) सांगली, मिरजेत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांच्यावतीने आज देण्यात आली.

समन्वयक डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, विजय पाटील, विलास देसाई यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील मोर्चाची तयारी आणि मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती दिली. मुंबईत येत्या नऊ ऑगस्टला आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी राज्यस्तरीय बैठक रविवारी झाली. सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. समितीत प्रत्येक जिल्ह्याचे पाच प्रतिनिधी आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा एक प्रतिनिधी आणि सर्व पक्षीय आमदार सरकारशी चर्चेसाठी जाणार आहेत. राज्यभर सर्व जिल्ह्यांत ५७ मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले. त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही.  सरकारकडे कोणत्या मागण्या मांडायच्या याचा विचार करून राज्यस्तरीय समिती मसुदा तयार करीत आहे.

जिल्ह्यात १५ दिवस मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाच्या बैठका गावोगावी झाल्या. ५४५ गावांत  बैठका होऊन मोर्चाचा संदेश देण्यात आला. अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक तालुक्‍यांत मोटारसायकल रॅली काढून जागृती करण्यात आली.

स्वखर्चाने मोर्चाला जाण्याची तयारी करावी लागणार  आहे. स्वत:ची वाहने, खासगी वाहने, एस. टी., रेल्वे आदी वाहनांतून मुंबईला दोन-तीन दिवस आधीच पोहोचण्याच्या तयारीने निघावे. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे निवासाची सोय असल्यास आधी पोचावे म्हणजे मोर्चा दिवशी सकाळी वेळेत सहभागी होता येईल.

मोर्चाच्या वाहनांना परवानगी
मोर्चा दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईत फक्त एस. टी. आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. इतर वाहनांना मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहने दूरवर पार्क करून यावे लागणार आहे. वाहनाने येणाऱ्या मराठा बांधवांनी पनवेल ते वाशी या मार्गावर वाहने पार्क करावित. तेथून लोकलने मुंबईत यावे. कॉटन ग्रीन, रे रोड येथे उतरल्यास तेथून भायखळा येथे जाऊन नंतर आझाद मैदानाकडे जाता येते.

सांगली, मिरजेत शनिवारी रॅली

सांगली आणि मिरजेत येत्या शनिवारी मोटारसायकलवरून रॅली काढण्यात येणार आहे. मिरजेत सकाळी दहा वाजता, तर सांगलीत सकाळी अकरा वाजता रॅली सुरू होईल. सांगलीतील रॅली क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून सुरू होणार आहे. या रॅलीत मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. धनाजी कदम, संदीप पाटील, अशोक पाटील, मनीषा माने, राहुल पाटील, धनंजय वाघ, प्रमोद लाड आदी उपस्थित होते.

रेल्वे मोफत, टोल माफ
मराठा क्रांती मोर्चाचा टी शर्ट, बॅज असणाऱ्या कार्यकर्त्यांना रेल्वेने मोर्चासाठी मोफत जाता येणार आहे. वाहनांनी येणाऱ्यांची संख्या पाहता महामार्गावर मोठी गर्दी असणार आहे. त्यामुळे टोल भरण्यास वेळ लागल्यास महामार्ग ब्लॉक होऊ शकतो. त्यामुळे मोर्चासाठी टोल माफ करावा, असे पत्र कंपन्यांना देण्यात आले आहे.

महिलांसाठी खास सोय
मोर्चासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या पाचशे महिलांसाठी जुन्या पुणे-मुंबई हायवे वर युके रिसॉर्ट आहे, तेथे निवासासह अन्य सोयी मोफत करण्यात आल्या आहे. पावसाची शक्‍यता असली तरी कुठल्याही परिस्थितीत मोर्चात सहभागी होण्याचा समाजाचा निर्धार आहे. मोर्चा आधी दोन दिवस आणि नंतर दोन-तीन दिवस थांबण्याच्या तयारीने मराठा बांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे.

सांगली, मिरजेतून पाच रेल्वे
सांगली, मिरजेतून पाच रेल्वे गाड्या मुंबईला जातात. महालक्ष्मी, कोयना, कुर्ला, सह्याद्री, चालुक्‍य या गाड्या मुंबईला जातात. त्यांच्या वेळा लक्षात घेऊन मोर्चासाठी जाणाऱ्या बांधवांनी तयारीने निघावे, असे आवाहन समन्वयकांनी केले आहे.

Web Title: sangli news 1.5 lakh person go to mumbai maratha kranti morcha