सांगली जिल्ह्यात ३८ ठिकाणी मृत्यूचे सापळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

सांगली - जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाढलेल्या अपघातांना आवर घालण्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या वतीने अपघात ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला असून जिल्ह्यात ३८ ठिकाणे मृत्यूचे सापळे तयार झाल्याचे पुढे आले आहे.

सांगली - जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाढलेल्या अपघातांना आवर घालण्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या वतीने अपघात ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला असून जिल्ह्यात ३८ ठिकाणे मृत्यूचे सापळे तयार झाल्याचे पुढे आले आहे. आता तेथील अपघात टाळण्यासाठीच्या उपाय योजनांचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शासनाकडे सादर केला आहे. अनेकांचे जीव वाचावेत, यासाठी आता तरी लोकप्रतिनिधींनी या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाठपुरावा करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या उपाय योजनांच्या  पूर्ततेसाठी सुमारे चारशे कोटींची गरज आहे.

जिल्ह्यात दरवर्षी अपघातांची संख्या वाढत आहे. वाढती वाहन संख्या, खराब रस्ते, बेदरकार ड्रायव्हिंग, अशी कारणे पुढे येत असली तरी प्रत्यक्ष काही जागाही या अपघातांना निमंत्रणे देणाऱ्या आहेत. प्रवासी गंभीर जखमी होतात. त्यात अनेकांना जीवास मुकावे लागते. वर्षानुवर्षे होणाऱ्या या अपघातांची पुरेशी कारणमीमांसा होत नाही. आता प्रथमच अपघाताची ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक, एस. टी. महामंडळ  आणि सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग या विविध खात्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने संयुक्त समिती स्थापन करून त्यांनी हा सर्व्हे केला आहे.

तीन वर्षांतील अपघातांचा सर्व्हे
अपघात जागांचा गेल्या तीन वर्षांतील सर्व्हे करण्यात आला. एक एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या काळात झालेल्या अपघातांची माहिती घेण्यात आली. प्रत्यक्ष स्थळ पाहणी झाली. यात पाच ते दहाजण ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत. अशा ठिकाणांना अपघात ठिकाण म्हणून निश्‍चित करण्यात आले.  जिल्ह्यात अशी एकूण ३८ ठिकाणे निश्‍चित झाली. ती वगळता किरकोळ अपघात होणारी ठिकाणांची संख्या वेगळीच आहे.

नेमक्‍या कारणांचा शोध
समितीने गंभीर अपघाताच्या ठिकाणी जाऊन अपघात होण्याची कारणे कोणती, तेथील त्रुटी आणि उपाय योजनांचा अभ्यास झाला. सादर झालेल्या या अहवालात दुभाजक नाहीत. अपघाताचा इशारा देणारे फलक नाहीत, रस्ता दोन्ही बाजूला कुठे संपतो ते दर्शवणारे ब्लिंकर्स नाहीत, वळणे धोकादायक आहेत. अशी अनेक कारणे प्रामुख्याने आहेत. 

अपघात ठिकाणे
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांतील अपघातांची माहिती घेऊन काढलेल्या निष्कर्षानुसार मोठ्या संख्येने भीषण अपघात सातत्याने होणाऱ्या ठिकाणांमध्ये नागज फाटा, येलूर फाटा, इटकरे फाटा, वाघवाडी फाटा, लक्ष्मी फाटा या ठिकाणांचा समावेश आहे. यांच्या नंतर पेठ नाका, आष्टा नाका, महाराजा हॉटेल कुची, तासगाव फाटा शिरढोण, कुची कवठेमहांकाळ फाटा, कामेरी, तांदुळवाडी, येडेनिपाणी फाटा, सिद्धेश्‍वर मंदिर कवलापूर, केरेवाडी, शेळकेवाडी, भोसे येथे हे स्पॉट आहेत. 
 

Web Title: Sangli News 38 accident spot defined