सांगली जिल्ह्यात ९९४ कोटींची कर्जे थकीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

१८ बॅंकांचा माहितीला विलंब - जिल्हा बॅंकेसह १२ बॅंकांची माहिती उपलब्ध  

१८ बॅंकांचा माहितीला विलंब - जिल्हा बॅंकेसह १२ बॅंकांची माहिती उपलब्ध  

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकांची मार्च २०१७ अखेर ९१ हजार ७२ शेतकऱ्यांची ९९४.०३ कोटी रुपयांची कर्जे थकली आहेत. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ४४६ कोटी कर्जांचा समावेश आहे. यामध्ये ५४ हजार ८८५ शेतकऱ्यांचे ५२१.५९ कोटी पीक कर्ज आणि  ३६ हजार १८७ शेतकऱ्यांच्या ४७२.७१ कोटी शेतीपूरक कर्जांचा समावेश आहे. याच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल, असे नाही. जिल्हा बॅंक वगळता अन्य बॅंकांकडे अल्पभूधारक, मध्यमभूधारक किंवा मोठ्या शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची नेमकी माहिती उपलब्ध नाही.  

राज्य शासनाने अल्प आणि मध्यम भूधारकांसाठी सरसकट आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी सशर्त सरसकट कर्जमाफीचा निर्णय रविवारी जाहीर केला. सरकारच्या कर्जमाफी धोरणानंतर जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या माफीचा फायदा मिळणार, किती कोटीत कर्ज माफ होणार, याची गेली दोन दिवस चर्चा सुरू आहे. बॅंकांनाही अद्याप राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे लेखी आदेश मिळाले नसल्यामुळे अनेक जबाबदार अधिकारी नेमकी आकडेवारी देण्यास धजावत नाहीत. परिणामी, सद्य:स्थितीत तरी मार्च २०१७ अखेर थकबाकीच्या आकडेवारीशिवाय कोणीही काहीही माहिती देण्यास पुढे येत नाही. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह स्टेट बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक ऑफ इंडिया, देना बॅंक,  कॅनरा बॅंक, सिंडिकेट बॅंक, युको बॅंक, फेडरल बॅंक, आरबीएल बॅंक, एचडीएफसी बॅंक, ॲक्‍सिस बॅंक, विदर्भ कोकण बॅंक, इंडियन ओव्हरसियर बॅंक आणि बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांची मार्च २०१७ अखेर ९१ हजार ७२ शेतकऱ्यांची ९९४.०३ कोटी रुपयांची कर्जे थकली आहेत. यामध्ये ५४ हजार ८८५ शेतकऱ्यांना ५२१.५९ कोटी पीक कर्ज आणि  ३६ हजार १८७ शेतकऱ्यांच्या ४७२.७१ कोटी शेतीपूरक कर्जांचा समावेश आहे. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सन २०१६-१७ आर्थिक वर्षात अल्पभूधारक ६० हजार ६४० शेतकऱ्यांचे ४४६.७३ कोटी रुपये  पीक कर्ज थकीत आहे. त्यात ३३२.७१ कोटी पीक  कर्ज आणि शेतीपूरक कर्जांच्या १३४.०२ कोटी रुपयांचा समावेश आहे.

Web Title: sangli news 994 crore loan arrears