दुधाळ जनावरांना मिळणार ‘आधार’ क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पशुसंवर्धनची मोहीम - पहिल्या टप्प्यात दीड लाख जनावरांना १२ अंकी बिल्ला

सांगली - ‘आधार’ कार्डच्या धर्तीवर दुधाळ जनावरांना देखील ‘युनिक आयडी’ अर्थात ‘विशिष्ट ओळख क्रमांक’ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दीड लाख दुधाळ जनावरांना १२ अंकी क्रमांकाचा बिल्ला कानात बसवला जाईल. सर्वच दुधाळ जनावरांना हा क्रमांक देणे बंधनकारक केले आहे. जनावरांना क्रमांक दिल्यानंतर सर्व माहिती ‘इनाफ’ संगणक प्रणालीमध्ये भरली जाईल. दुधाळ जनावरांची अशा प्रकारे माहिती प्रथमच संकलित होत आहे.

केंद्राच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत देशभरात जनावरांची ओळख पटवून त्यांच्या प्रजननाबाबत माहिती ऑनलाईन संकलित केली जाणार आहे. त्यासाठी १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांकाचे बिल्ले, ‘इनाफ’ संगणक प्रणाली, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्याकडून उपलब्ध झाली आहे.

आतापर्यंत विविध योजनेतून, दूध संघाकडून खरेदी केलेल्या जनावरांनाच विमा कंपन्याकडून बिल्ले कानात बसवले जात होते. मात्र आता सर्वच दुधाळ जनावरांना माणसाप्रमाणे १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. १२ अंकी क्रमांकाचा बिल्ला जनावराच्या कानात बसवला जाईल.

जनावरांची नोंदणी करून १२ अंकाचा बिल्ला कानात बसवताना सर्व प्रकारची माहिती संकलित केली जाईल. दूध संकलन किती होते, जात कोणती, मालकाचे नाव आदी माहिती गोळा करून ती संगणक प्रणालीवर नोंदवली जाईल. त्यामुळे जनावरांची वंशावळ, दुग्धोत्पादन  याबाबत माहिती पशुसंवर्धन विभागास एका क्‍लिकवर मिळेल. पशुसंवर्धन विभागाच्या सेवा भविष्यात मिळण्यासाठी विशिष्ट ओळख क्रमांकाचा बिल्ला असणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे पशुपालकांना देखील त्यांच्या जनावरांची माहिती सहज उपलब्ध होईल. जनावर विकले किंवा नवीन खरेदी केले तर मागील प्रजननाच्या नोंदी, जनावरांची वंशावळ आदी माहिती मिळेल. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दीड लाख दुधाळ जनावरांना आधारच्या धर्तीवर १२ अंकी विशिष्ट क्रमांक मिळेल. जिल्ह्यात प्रतिदिन ७०० हून अधिक जनावरांना १२  अंकी क्रमांकाचा बिल्ला कानात बसवला जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय मिरज येथे आज सर्व पशुधन विकास अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले. वर्षभर ही नोंदणी मोहीम सुरू राहणार आहे. दुधाळ जनावरांच्या  मालकाकडे पशुवैद्यकीय अधिकारी आल्यास जनावरांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

सर्व दुधाळ जनावरांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या सेवा मिळण्यासाठी ओळख क्रमांकाचा बिल्ला असणे आवश्‍यक आहे. नोंदणीमुळे पशुपालकांना सहज संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात दीड लाख दुधाळ जनावरांची नोंदणी होईल. जास्तीत जास्त पशुपालकांनी नोंदणी करावी.
- डॉ. विजय सावंत (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी)

Web Title: sangli news aadhar number for milk production animal