प्रशासकीय इमारतीला अस्वच्छतेचा विळखा...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - जिल्हाधिकारी कार्यालयाचीही तीच गत होणार? 

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष - जिल्हाधिकारी कार्यालयाचीही तीच गत होणार? 

सांगली - सांगली-मिरज रोडवर विजयनगर येथे नुकतेच उद्‌घाटन झालेली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत देखणी दिसत आहे; मात्र तिच्याच शेजारी  असलेली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुर्गंधी, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय तर नाहीच, उलट प्रसाधनगृहांची अस्वच्छता आणि इमारतीभोवती झालेला कचरा कोंडाळे पाहता येथे येणारे नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. या इमारतीच्या देखभालीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची अवस्थाही अशीच होणार काय, असा प्रश्‍न उपस्थित  झाला आहे.

गेल्या पंधरवड्यात या इमारतीत पाणीही नव्हते. अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झालेला असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहेच; शिवाय अस्वच्छतेमुळे येथे येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून फिरावे लागते इतकी दुर्गंधी येथे पसरली आहे. मात्र या ठिकाणी असणाऱ्या सुमारे २२ कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची फिकीर नाही. त्यामुळे या कचरा कोंडाळ्याबाबत त्यांच्याकडून चकार शब्द काढला जात नाही. 

अनेक ठिकाणचे नळही मोडले आहेत.  वॉशबेसिनचे नळ गायब झालेत. फिल्टरच्या नळाजवळ मोकळ्या बाटल्यांचा ढीग साठलेला आहे. इमारतीभोवती कचऱ्याचे साम्राज्य दिसते. अनेक भिंती मावा, गुटखा, पानाच्या पिचकाऱ्याने रंगल्या आहेत.

या ठिकाणच्या कार्यालयांसाठी एमआयडीसीकडून महागडे पाणी घेण्यात आले आहे. मात्र तेही वेळेत मिळत नाही अशी अवस्था आहे. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे काम सुरू असताना जेसीबीच्या वापरामुळे परिसरातील पाईपलाईन फुटली. त्यामुळे इमारतीचा पाणी पुरवठा खंडित झाला. परिणामी कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागते किंवा घरून येताना पाण्याच्या बाटल्या घेऊन याव्या लागत आहेत.

प्रसाधनगृहांची दुर्दशा 
शासकीय कामासाठी प्रशासकीय इमारतीतील प्रत्येक मजल्यावर प्रसाधनगृहे आहेत. मात्र त्यांची दुर्दशा  बघवत नाही. त्या ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याची यंत्रणेची दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यातून दररोज मोठ्या संख्येने लोक येथे येतात. आधीच सरकारी काम ते वेळेत होत नाहीच. त्यामुळे नागरिकांना येथे ताटकळत थांबावे लागते. पण त्यांच्यासाठी या सुविधा बिनकामाच्या आहेत. स्वच्छतागृहे, प्रसाधन गृहांमधील दुर्गंधी संपूर्ण इमारतीमध्ये पसरली आहे. येथे नागरिकांचे स्वागतच दुर्गंधीने होते. तर कर्मचाऱ्यांना या  परिस्थितीतच काम करावे लागत आहे. याचा सर्वांत मोठा फटका महिला कर्मचाऱ्यांना बसत आहे.

कार्यालयात पाण्याला पैसे
या इमारतीमध्ये वॉटर एटीएम बसवण्याची यंत्रणा येऊन पडली आहे. मात्र त्यासाठी पाणी कुठले घ्यायचे या  वादात ती यंत्रणा सडत आहे. वॉटर एटीएमसाठी पाण्याचे कनेक्‍शन प्रशासनाने देण्याची गरज आहे. पण ते देण्यास असमर्थता दर्शवल्याने ही यंत्रणा पडून आहे. पण ही यंत्रणा जरी बसली तरी येथे येणाऱ्या नागरिकांना विकत घेऊन पाणी प्यावे लागणार हे दुर्दैवी आहे. वास्तविक जनतेसाठी काम करणाऱ्या शासकीय कार्यालयांना नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची आवश्‍यकता असताना ग्लासभर पाण्यासाठी पैसे मोजावे लागतील.

अग्निशमन यंत्रणा कालबाह्य
इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर सुमारे १८ ते २० अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. ही यंत्रणा २०१३ मध्ये बसवली आहे. त्याची मुदत एक वर्षाची असते. आता चार वर्षे झाली तरी त्या बदललेल्या नाहीत. 

जिल्हाधिकारी कार्यालयाचे काय?
ही अवस्था जर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची असेल  तर नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची अवस्था काय होईल याचा विचारच न केलेला बरा. या इमारतीचेही बरेच काम अजून सुरू आहे. तरीही तेथे कार्यालयांचे स्थलांतर सुरू आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांची अवस्थाही अशीच होणार का? इमारत देखणी असली तरी तिची निगाही ठेवावी लागणार. प्रसाधन गृहे, इमारतीची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागणार आहे.

Web Title: sangli news administrative building uncleaned