आमदार खाडेंविरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने 

संतोष भिसे
मंगळवार, 19 जून 2018

मिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने केली. खाडे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. किसान चौकात आंदोलन झाले. दरम्यान, खाडेंच्या संपर्क कार्यालयासमोरही समर्थकांनी गर्दी केली होती. तोडीस तोंड उत्तर देण्याची तयारी त्यांनी केली होती. पण पोलिसांनी त्यांना आमने-सामने येण्यापासून परावृत्त केले. यानिमित्त मार्केट परिसरात सकाळी तासभर तणावपुर्ण वातावरण होते. 

मिरज पंचायत समितीत वसंतदादा पाटील सभागृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार खाडे यांनी दादांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याची विरोधकांची तक्रार आहे. खाडेंच्या भाषणाची चित्रफीत व्हायरल झाली आहे. विरोधकांनी त्यांचा निषेध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. किसान चौकात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, स्वाभीमानी रिपब्लीकन पक्ष, भटक्‍या-विमुक्त संघटना आदींचे कार्यकर्ते जमा झाले.

कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, पंचायत समितीतील गटनेते अनिल आमटवणे, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, प्रा. सिद्धार्थ जाधव आदींनी नेतृत्व केले. संपुर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या वसंतदादांचा अवमान करण्याचा अधिकार खाडेंना नाही असे त्यांनी ठणकावले. कार्यकर्त्यांनी खाडेंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. शेतकरी संघटनेचे महावीर पाटील यांनी दहनासाठी पुतळा प्रतिकात्मक आणला होता. पोलिसांनी तो ताब्यात घेतला. पाटील यांनाही ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. पाटील यांच्या सुटकेसाठी पोलिसांपुढे ठिय्या मारला. वादविवादानंतर पाटील यांना पोलिसांनी सोडले. 

मिरज पूर्वसह पश्‍चिम भागातून दादाप्रेमी कार्यकर्ते आंदोलनासाठी गोळा झाले होते. संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. गटनेते किशोर जामदार, अकबर मोमीन, सचिन जाधव, आप्पासाहेब हुळ्ळे, कैलास पाटील, प्रकाश कांबळे, सदाशिव वाघमारे, राहूल मोरे, गणेश देसाई, प्रमोद इनामदार, स्वाभीमानी रिपब्लीकनचे डॉ. महेशकुमार कांबळे, राकेश कोळेकर, धनराज सातपुते, महंमद मणेर, पंचायत समिती सदस्य सतीश कोरे, संजय मेंढे, रंगराव जाधव, शेतकरी संघटनेचे बी. आर. पाटील, गंगाधर तोडकर, आबासाहेब चव्हाण, सलीम मुजावर, अनिल कब्बुरे, अशोकसिंग रजपुत, तुषार खांडेकर, समर कागवाडे, रणजीत देसाई, संजय ऐनापुरे, नरेंद्र मोहिते, अण्णा खोत आदी सहभागी झाले. 

Web Title: Sangli News agitation against MLA Khade