घोडेबाजाराला लगाम घाला - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सांगली - लोकसभा, विधानसभेला जे घडले ते आता तरी होऊ देऊ नका. पाच-पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक विकत घेण्याचा प्रकार घडत आहे. खोटी आश्‍वासने देऊन जनतेचा विश्‍वासघात केला जात आहे. हे कुठंतरी थांबवण्याची गरज आहे. म्हणून महापालिकेच्या येत्या निवडणुकीत घोडेबाजाराला लगाम घाला. भाजप-शिवसेनेला खड्यासारखे बाजूला ठेवा. राष्ट्रवादीला संधी द्या, असे आवाहन आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्टेशन चौकातील सभेत केले.

सांगली - लोकसभा, विधानसभेला जे घडले ते आता तरी होऊ देऊ नका. पाच-पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक विकत घेण्याचा प्रकार घडत आहे. खोटी आश्‍वासने देऊन जनतेचा विश्‍वासघात केला जात आहे. हे कुठंतरी थांबवण्याची गरज आहे. म्हणून महापालिकेच्या येत्या निवडणुकीत घोडेबाजाराला लगाम घाला. भाजप-शिवसेनेला खड्यासारखे बाजूला ठेवा. राष्ट्रवादीला संधी द्या, असे आवाहन आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्टेशन चौकातील सभेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारच्या फसव्या घोषणांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या हल्लाबोल आंदोलन यात्रेची सभा रात्री येथील स्टेशन चौकात झाली. श्री. पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री अण्णा डांगे यांनी केंद्र, राज्याच्या फसव्या घोषणांचा समाचार घेत चौफेर टीका केली.

श्री. पवार म्हणाले, ‘‘देवेंद्र - नरेंद्रांनी लोकांना स्वप्ने दाखवली. ती फोल ठरल्याचा अनुभव जनता घेत आहे. चुकीच्या बातम्यांबद्दल पत्रकारांविरोधात फतवा काढून मुस्कटदाबी केली जात आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही कुठल्याही घटकाला न्याय नाही. भाजपच्या काळात गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे.

वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी राज्यात विकासाची भूमिका घेतली. सांगलीला महत्त्वाची पदे मिळत होती. आमच्या काळात तीन तीन कॅबिनेट मंत्री दिले. आज पाच आमदार, दोन खासदार देऊनही मंत्रिपद देण्याची दानत भाजप, शिवसेनेने दाखवली नाही.’’ शेतकऱ्यांना न्याय मिळाला, बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या जातीयवाद मिटला का’’, असे सवाल त्यांनी केले.

ते म्हणाले, ‘‘भाजपचे मंत्री शेतकऱ्यांच्या जीवावर सत्तेत येऊन त्यांना विचारत नाहीत. सामान्य माणूस सुरक्षित नाही. अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला जात नाही. त्यांच्या धर्मात हस्तक्षेप केला जातो.’’ ‘‘शेतकऱ्याला दोन पैसे मिळून देणारे हे सरकार शेतकरी विरोधी आहे. महाराष्ट्राला मागे नेणारे, जातीजातीत तेढ निर्माण करणारे आहे. सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नाही म्हणून कोरेगाव भीमासारखी प्रकरणे घडतात, असा आरोप त्यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, ‘‘चार वर्ष सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ७१ हजार कोटींचे कर्ज माफ केले. या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सर्व क्षेत्रात आज असंतोषाची भावना आहे. अशावेळी श्री. पवार यांच्यासारखे नेतृत्वच या देशाला दिशा देऊ शकते.’’

श्री. जयंत पाटील म्हणाले, ‘‘सरकारच्या नाकर्तेपणावर हल्लाबोल आहे. मनपा निवडणूक येत आहे. पाच वर्षांपूर्वी सत्ता दिली. त्यावेळी जे बोललो ते प्रकल्प शहरात आणले. काही मार्गी लागले. काही अडले. पुन्हा संधी मिळाली तर रखडलेले प्रकल्प चांगल्या पद्धतीने पुढे नेल्याशिवाय राहणार नाही.’’
शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, महिला अध्यक्षा विनया पाठक, छायाताई पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, विरोधीपक्ष नेते शेडजी मोहिते, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

रक्षकच भक्षक
आर. आर. आबांनी डान्सबार बंदी केली तर यांनी ती उठवून पुन्हा सुरू केले. ‘गायीला वाचवा, बाईला नाचवा’ ही काय पद्धत आहे? अनिकेत कोथळेने काय केले होते? त्याला का मारले? रक्षकच भक्षक झाले. सरकार बघ्याची भूमिका घेते, अशी टीका श्री. पवार यांनी केली.

Web Title: sangli news ajit pawar talking politics