महिन्यानंतरही अनिकेतच्या मृत्यूचे गुढ कायम

maharashtra police
maharashtra police

सांगली: अनिकेत कोथळेच्या कोठडीतील खुनाला आज (बुधवार) एक महिना पुर्ण झाला. राज्यात खळबळ माजवणाऱ्या या घटनेने वर्दीतील क्रौर्याची बाजू समाजासमोर आणली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. त्यांनी या घटनेतील संशयित बडतर्फ पाच पोलिसांसह एका झिरो पोलिसाची तसेच पोलिस अधिकारी यांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. डीएनए अहवालात मृतदेह अनिकेतचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलिस कोठडीत अनिकेतचा बळी घेण्यापर्यंत त्याला का मारण्यात आले? याचे गूढ महिन्यानंतरही कायम आहे.

गेल्या महिन्यात सहा नोव्हेंबरला अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना आकाशवाणीजवळ संतोष गायकवाड या अभियंत्याला लुटल्या प्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना तातडीने न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि तीन दिवसांची पोलिस कोठडीही न्यायालयाने सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत झाली. त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास या प्रकरणातील तपास अधिकारी उपनिरीक्षक युवराज कामटे यांनी या दोघांना चौकशीसाठी डीबी रुममध्ये घेतले. तेथे अनिकेतच्या अंगावरील कपडे काढून तोंडाला काळे कापड बांधून हात मागे बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला छताला उलटे टांगून खाली पाण्याची बादली ठेवून पुन्हा मारहाण केली. त्याचे तोंडही पाण्यात बुडवण्यात येत होते. माझा श्‍वास गुदमरतोय मला सोडा अशी विनवणी करत असतानाही त्याला युवराज कामटे, अनिल लाड, अरुण टोणे, झाकीर पट्‌टेवाले मारहाण करत होते. यावेळी अमोल भंडारेही तेथेच होता. अचानक छताला बांधलेली दोरी तुटल्याने अनिकेत खाली बादलीत डोक्‍यावर पडला. त्यानंतर त्याला पाठीवर झोपवून पुन्हा मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

अनिकेतची हालचाल थंडावल्याचे लक्षात येताच कामटेसह इतर पोलिसांनी त्याचा मृतदेह पोलिसांच्या बेकर मोबाईल व्हॅनमधून बाहेर नेला. त्यानंतर तो अनिल लाडच्या सेलेरो गाडीतून आंबोलीत नेऊन जाळला. मृतदेह दोनवेळा जाळूनही तो पुर्ण जळाला नाही.

देशातील पहिलीच घटना
ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यावर पोलिसांनीच संशयिताचा बळी घेऊन त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याने राज्य हादरुन गेले. या घटनेने जनतेचा संताप झाला. अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी कामटेसह पाचही पोलिसांना निलंबित केले. नंतर त्यांना बडतर्फही करण्यात आले. कायदा सुव्यवस्था आणि सीआयडी या दोन्ही विभागाचे अप्पर महासंचालक सांगलीत आले. पोलिसांनीच एखाद्याचा थर्ड डिग्री मारहाण करुन त्याचा मृतदेह जाळण्याची देशातील पहिलीच घटना असावी असे मत कायदा सुव्यवस्थेचे अप्पर महासंचालक बिपीन बिहारी यांनी व्यक्त केले होते. पोलिस दलाच्या यंत्रणेत काही त्रुटी असल्याचेही त्यांनी मान्य केले होते.

दरम्यान, अनिकेतच्या कुटुंबियांनी अनिकेतचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच तत्कालीन उपअधीक्षक दिपाली काळे यांना सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी लकी बॅग दुकानाचा मालक आणखी एक मध्यस्थ यांच्याबद्दलही त्यांनी संशय व्यक्त केला.

सीआयडीकडे तपास
सीआयडीचे अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड आणि उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. त्यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या कलमांच्या आधारे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. संशयितांसह त्या दिवशी पोलिस ठाण्यात असणारे कर्मचारी, ठाणे अंमलदार यांचेही जबाब नोंदवून घेतले. पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर, लकी बॅग दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर ताब्यात घेतले आहेत.

अनेक प्रश्‍न अनुत्तरीतच
या घटनेतील सहा प्रमुख संशयितांनी चौकशीत काही सहकार्य केले नाही. तसेच कामटेचा मोबाईल मिळालेला नाही. घटना घडल्यानंतर काही वेळातच कामटेने काहींना फोन केले होते. ते कोण? त्यांच्याशी काय बोलणे झाले? हे अद्याप समोर आलेले नाही. केवळ दोन हजार रुपये आणि एका मोबाईलच्या चोरीसाठी अनिकेतला अमानुष मारहाण करुन त्याचा बळी घेणे हे संशयास्पद आहे. त्यामुळेच त्याच्या खुनाचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. महिन्यानंतरही ते गुढच आहे. जनक्षोभाचे कारण झालेल्या या घटनेत सीसीटीव्हीचे डीव्हीआर मिळाले मात्र त्यात नेमके काय आहे ते अद्याप समोर आलेले नाही. मोबाईल कॉल रेकॉर्डही मिळालेले नाही. अमोल भंडारेला कृष्णा घाटावर घेऊन थांबलेल्या दोघांचा तपासही लागलेला नाही.

अजून दोन महिने
एकूणच या खळबळजनक घटनेला एक महिना आज पुर्ण झाला. सीआयडीला या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी हातात आहे. त्यापुर्वी त्यांना अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधायची आहेत. या सर्व घटनेचा घटनाक्रम जुळवणारे पुरावे गोळा करायचे आहेत. पोलिस दलाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घटनेतील संशयितांना कोणत्याही संशयाचा फायदा मिळणार नाही, असे पुरावे गोळा करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com