मोदी सरकार म्हणजे हुकूमशाही - हजारे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

मतदारांनी सरकार बदलले; पण जराही भ्रष्टाचार थांबला नाही. त्यासाठी पूर्वीच्या लोकपाल विधेयकासाठी २३ मार्चपासून दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

आटपाडी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार इंग्रजांसारखे हुकूमशाही आहे. त्यांनी लोकपाल विधेयक तीन दिवसांत विना चर्चा कमजोर करून विधेयक मंजूर केले. मतदारांनी सरकार बदलले; पण जराही भ्रष्टाचार थांबला नाही. त्यासाठी पूर्वीच्या लोकपाल विधेयकासाठी २३ मार्चपासून दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

आटपाडी बचत भवन येथे अण्णांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. २३ मार्चपासून समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत ‘जंतर-मंतर’वर पूर्वीचे लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. त्याच्या जनजागृतीसाठी येथे ही सभा घेण्यात आली. या वेळी समाजसेविका कल्पना इनामदार, राळेगणसिद्धीचे सरपंच लोभेश अवढे, अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे  जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र राजमाने उपस्थित होते. 

अण्णा हजारे म्हणाले, ‘‘प्रत्येक मतदार देशाचा मालक आहे. तेच त्यांना माहिती नाही. देशाचे मालक झोपल्यामुळे देशाच्या तिजोरीची चोरी सुरू आहे. ती थांबली पाहिजे. त्यासाठी पूर्वीचे लोकपाल विधेयक मंजूर केले पाहिजे. यासाठीच आमचा लढा सुरू आहे. मोदी सरकारची फक्‍त घोषणाच ‘भ्रष्टाचार मुक्‍त भारत’ची असून, अत्यंत कमजोर करून विधेयक आणले आहे. त्यात अनेक पळवाटा आहेत. कसली मन की बात, मनच स्वच्छ नाही. एका दिवसात अत्यंत महत्त्वाची चाळीस विधेयके, तेही कसलीही चर्चा न करता मंजूर केली जातात. आमची लढाई समाज आणि देशासाठी आहे. यात मरण आले, तर ते आमचे सौभाग्य आहे.’’

‘‘आटपाडी दुष्काळी भाग आहे. आमचेही गाव दुष्काळी होते. पिण्यासाठी पाणीही नव्हते. आज गावकऱ्यांनी एकत्र येऊन थेंबन्‌ थेब अडविल्यामुळे चारशे एकर शेती ओलिताखाली आली. त्या गावातून साडेसहा हजार लिटर दूध बाहेर जाते. गावाच्या परिवर्तनासाठी गावकऱ्यांनी एकत्र यावे. आमच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. कार्यकर्ते पक्षविरहित पाहिजेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रावर निवडणूक न लढविण्याची हमी द्यावी.’’ असेही हजारे यांनी सांगितले. स्वागत श्रीमती इनामदार यांनी केले.

Web Title: Sangli News Anna Hajare Comment