दोषारोपपत्र बदलासाठी अर्ज देणार - ॲड. उज्ज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सांगली - हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खूनप्रकरणाची सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्यासमोर सुरू झाली. या  खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, खुनातील संशयितांवर दाखल केलेले दोषारोपपत्रात (चार्जशीट)  मध्ये बदल करण्यासाठी अर्ज देणार असल्याचे ॲड. निकम असल्याचे सांगितले. खटल्याच्या पुढील सुनावणी आता १० ऑक्‍टोबरला आहे.

सांगली - हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खूनप्रकरणाची सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्यासमोर सुरू झाली. या  खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, खुनातील संशयितांवर दाखल केलेले दोषारोपपत्रात (चार्जशीट)  मध्ये बदल करण्यासाठी अर्ज देणार असल्याचे ॲड. निकम असल्याचे सांगितले. खटल्याच्या पुढील सुनावणी आता १० ऑक्‍टोबरला आहे.

खटल्याची हकीकत अशी - धोंडेवाडी (ता. खानापूर) येथील विद्या घोरपडे हिचा विवाह हिवरे येथील बळवंत जनार्दन शिंदे यांच्याशी झाला होता. विद्याने २००९ मध्ये आत्महत्या केली होती. हा प्रकार विद्याच्या माहेरी न कळविताच तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करण्यात  आले. त्यामुळे घोरपडे आणि शिंदे कुटुंबात वाद होता. विद्याचा भाऊ सुधीर सदाशिव घोरपडे याने बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले होते. सुधीर घोरपडे,  रवींद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) आणि अल्पवयीन साथीदार २१ जून २०१५ रोजी हिवरे येथे आले. मृत विद्याच्या सासरची मंडळी मळ्यात न राहता गावात राहत होती. विद्याचे सासर समजून तिघेजण चुलत सासरे ब्रह्मदेव शिंदे यांच्या घरात आले. घरात कोणी पुरुष नसल्याचे पाहून प्रभावती ब्रह्मदेव शिंदे (वय ५२), प्रभावतींची विवाहित मुलगी सुनीता संजय पाटील (वय ३२, वायफळे, ता. तासगाव) यांच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. प्रभावतींची सून निशिगंधा बाळासाहेब शिंदे (वय २७) हिच्यावरही वार केला. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तीन महिलांचा नाहक बळी गेल्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले.

विटा पोलिस ठाण्यात बाळासाहेब ब्रह्मदेव शिंदे यांनी फिर्याद दिली. संशयित सुधीर घोरपडे, रवींद्र कदमला अटक केली. अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले. खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली. त्यानुसार काही महिन्यांपूर्वीच ॲड. निकम यांची नियुक्ती झाली. आज सुनावणीवेळी ॲड. निकम हजर राहिले. संशयित आरोपीविरुद्ध दाखल दोषारोपपत्रामध्ये आणखी कलम लावणे आवश्‍यक आहे. त्यासाठी अर्ज देणार असल्याचे सांगितले. तसेच बचावपक्षाचे वकील ॲड. सुतार यांनी संशयित रवींद्र कदमच्या जामिनासाठीही अर्ज दाखल केला. न्यायाधीश काकतकर यांनी १० ऑक्‍टोबर तारीख दिली.

ॲड. निकम तिसऱ्यांदा सांगलीत
मुंबईत बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य संशयित अजमल कसाबला फाशीच्या तख्तापर्यंत नेणारे विशेष सरकारी वकील निकम यापूर्वी अमृता देशपांडे आणि रितेश देवताळे खून खटल्यात सांगलीत आले होते. त्या वेळी ॲड. बारदेसकर, बेळगावचे ॲड. सदाशिव बेंचण्णावर यांच्याशी सामना रंगला. आता त्यांच्यासमोर सांगलीतील ॲड. प्रमोद सुतार असतील. वकील वर्गासह अन्यत्र या खटल्याची उत्सुकता आहे.

Web Title: sangli news The application for filing charge sheet will be filed