सांगली पोलिसांवर मध्य प्रदेशात हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सांगली -  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगलीत सापडलेल्या पिस्तुलांच्या पार्श्‍वभूमीवर तपासाचा झेंडा मध्य प्रदेशात लावला आहे. तेथील धामनोद जिल्ह्यात ही कारवाई केली. या वेळी आरोपीला पकडत असताना झालेल्या झटापटीत एका पोलिसाच्या हाताला आरोपीने चावा घेतल्याने तो जखमी झाला. भाटिया नामक आरोपीसह आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. या वृत्तास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

सांगलीत गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने हॉटेल जय मल्हारसमोर सातारा जिल्ह्यातील सनीदेव खरात आणि संतोष कुंभार या युवकांना अटक करून त्यांच्याकडून सात देशी बनावटीचे पिस्तूल आणि २७ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यांना पोलिसी खाक्‍या दाखवून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मध्य प्रदेशपर्यंत धडक मारली.

दोन दिवसांपूर्वी हे पथक सांगलीत कामगिरी फत्ते करून परतले. सांगलीत अटक केलेल्या दोघांनी दिलेल्या माहितीवरून मध्य प्रदेशमधील धामनोद जिल्ह्यात देशी बनावटीची पिस्तूल तयार करण्याचा कारखाना आणि बाजारपेठ असल्याची माहिती मिळाली. तेथे गेल्यावर पोलिसांनी संशयित आरोपींची माहिती काढली. त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता,

भाटिया आणि आणखी एकाला पोलिसांचा संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. अझर पिरजादे नावाच्या पोलिसाने एका संशयिताला पकडले होते. त्याच्याशी आरोपीने झटापट केली. त्याच्या हाताला चावा घेऊन सुटण्याचाही प्रयत्न केला; मात्र पिरजादेच्या पकडीतून आरोपी सुटू शकला नाही. तोवर पथकातील इतर पोलिसांनी त्याला पकडले. त्यांच्याकडून सहा पिस्तुले घटनास्थळीच ताब्यात घेतली, तर त्यांना घेऊन येताना वाटेत त्यांनी दिलेल्या माहितीवरून आणखी तीन पिस्तुले ताब्यात घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आठवडाभरात केलेल्या दोन कारवाईत एकूण १६ पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्या कामगिरीने हत्यारांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी हाताला लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुजोरा पण...
मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला, पण अधिकृत माहिती सांगण्यास नकार दिला. माध्यमांना मिळालेली माहिती अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

Web Title: Sangli news attack on Police