खंडणीस नकार दिल्याने तरुणावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

सांगली - बाळू भोकरे टोळीने गणेशनगरमध्ये एका तरुणावर तलवारीने खुनी हल्ला केला. यामध्ये मिलिंद प्रकाश चिनके (वय २१, रा. गणेशनगर, भुईराज हौसिंग सोसायटी) हा जखमी झाला आहे. त्याच्याकडे भोकरेने खंडणी मागितली होती.

सांगली - बाळू भोकरे टोळीने गणेशनगरमध्ये एका तरुणावर तलवारीने खुनी हल्ला केला. यामध्ये मिलिंद प्रकाश चिनके (वय २१, रा. गणेशनगर, भुईराज हौसिंग सोसायटी) हा जखमी झाला आहे. त्याच्याकडे भोकरेने खंडणी मागितली होती. त्याने नकार दिल्याने त्याच्यावर हल्ला केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात चिनके याने दिली आहे. या प्रकरणी शहर  पोलिसांनी बाळू भोकरे याच्यासह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर धीरज कोळेकर यास अटक केली आहे.

बाळू भोकरे याने मिलिंद चिनके याच्याकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. त्यासाठी त्याला वारंवार त्रास दिला जात होता. मात्र चिनके याने खंडणी देण्यास नकार दिला होता. याचा राग भोकरे टोळीच्या मनात  होता. त्यातून काल (ता. ५) दुपारी तीनच्या सुमारास गणेशनगरमध्ये मिलिंद चिनके याच्यावर बाळू भोकरे, धीरज आयरे, धीरज बाबासाहेब कोळेकर (वय २१, रा. गणेशनगर), अक्षय शिंदे आणि आणखी एकजण अशा पाचजणांनी हल्ला केला.

दोन पथके रवाना
भोकरे याच्यासह चार जणांच्या शोधासाठी शहर पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे. भोकरे टोळीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी, खुनाचा प्रयत्न, धमकावणे असे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी भोकरेसह चौघांना अटक करण्यासाठी कसून शोध मोहीम सुरू केली आहे.

बाळू भोकरे याचे  गणेशनगरमध्ये संपर्क कार्यालय आहे. त्याच परिसरात चिनके याचे घर आहे. काल दुपारी मिलिंद चिनके गणेशनगरमध्ये घराजवळ होता. त्यावेळी बाळू भोकरे आणि त्याचे चार साथीदार कार्यालयाजवळ होते. त्यांनी चिनके याला बोलवून घेतले. तेथे पुन्हा एकदा खंडणीचा विषय निघाला. चिनके याने खंडणी देण्यास नकार  दिल्याने त्याच्यावर पाचजणांनी हल्ला केला. यातील बाळू भोकरे याने चिनकेच्या तोंडावर रिव्हॉल्व्हर मारली तर धीरज आयरे आणि अक्षय शिंदे यांनी त्याच्यावर  तलवारीने वार केले. यामध्ये चिनके जखमी झाला.

चिनके याने या हल्ल्यानंतर सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली. पोलिसांनी बाळू भोकरेसह पाचजणांवर गुन्हा दाखल केला असून यातील धीरज कोळेकर याला अटक केली आहे. पोलिसांनी पाचजणांवर बेकायदापणे हत्यारे बाळगणे,  खुनी हल्ला करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल केले आहेत. धीरज कोळेकर याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Sangli News attack on the youth incidence