सांगली जिल्ह्यात ४७ हजार घरांत उजळणार ‘सौभाग्य’ दिवे

सांगली जिल्ह्यात ४७ हजार घरांत उजळणार ‘सौभाग्य’ दिवे

सांगली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला विनामूल्य वीजजोडणी देण्याची ‘सौभाग्य’ योजना जाहीर केली. जिल्ह्यात किती कुटुंबांना लाभ मिळणार याबद्दल उत्सुकता आहे; मात्र हा आकडा अनिश्‍चित असला तरी सुमारे ४७ हजार लोकांना तो मिळू शकेल, असा अपेक्षा आहे. 

२०११ च्या जनगणनेवेळी केलेल्या घरगणनेतील माहितीआधारे लाभार्थींची निवड केली जाणार आहे. सन २०१९ पर्यंत देशात सर्व घरांत वीज पोचवण्याचे  उद्दिष्ट ठेवून सरकारने नवी योजना आणली आहे. १६ हजार कोटींची तरतूदही केली आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या नव्या योजनेनुसार जिल्ह्यात सुमारे ४७ हजारांहून अधिक ग्राहकांना लाभ मिळू शकतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील चार कोटी गरीब कुटुंबांना विनामूल्य वीजजोडणी देण्याची योजना जाहीर केली. योजनेचे नाव ‘सौभाग्य’ असे जाहीर केले आहे. दीड वर्षात योजना राबवण्यासाठी १६ हजार कोटींची तरतूदही केली आहे. केंद्राची योजना चांगली आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत विद्युत कनेक्‍शन मिळू शकेल. देशात दुर्गम, मागास भागांसाठी केंद्राच्या योजनेचा निश्‍चित फायदा होईल. महाराष्ट्रासारखा पुढारलेल्या राज्यातही अनेक गरीब कुटुंबाकडे आजही वीज नाही, हे वास्तव आहे, मात्र ते कोणी ते मान्य करीत नाही. 

दरम्यान, महावितरणकडे वीज कनेक्‍शनसाठी अनामत भरली आहे; मात्र त्यांना विद्युत कनेक्‍शन देण्यात महावितरण यंत्रणेला अपयश आले. जिल्ह्यात असे ४ हजार ५८२ ग्राहक आहेत. घरगुती वीज कनेक्‍शन प्रलंबित आहेत. पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक घरी वीज कनेक्‍शन द्यायची घोषणा करून लोकांना पुन्हा  एकदा खूश करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यापूर्वी ज्यांनी अनामत भरून रितसर मागणी केलेल्यांना  कनेक्‍शन दिली, तर अनेकांच्या घरी वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. ग्राहकांना विद्युतपुरवठ्यासाठी निधीची कमतरता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात ४५८२ ग्राहकांनी महावितरणकडे अधिकृत अनामत रक्कम भरून कनेक्‍शनची मागणी केली आहे. त्यांना विनामूल्य नको, रक्कम भरल्यानंतर तरी तातडीने वीज पुरवठा व्हावा, अशी मागणी आहे. त्यांना कनेक्‍शन देण्यात महावितरणकडे निधीचा तुटवडा असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात प्रत्येक घरात वीज पुरवठा आहे का ? याचीही नेमकी माहिती महावितरणकडे नाही.

जिल्ह्यात ५.५१ लाख घरगुती ग्राहक आहेत. मात्र विजेच्या सोयीपासून किती वंचित आहेत याची नेमकी माहिती मिळत नाही. जिल्ह्याची कुटुंबसंख्या ग्रामीण, शहरी अशी सुमारे  ५.९८ लाख आहे. याचा अर्थ असा, की जिल्ह्यातील किमान ४७ हजार ६८० कुटुबांच्या घरी अद्याप वीज पोहोचलेली नाही. एका ग्राहकांकडे एकापेक्षा अधिक घरगुती कनेक्‍शन संख्या मोठी आहे. त्याचा विचार केला तर ही संख्या आणखी वाढू शकते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com