‘त्या’ भिंतीआड नक्की चालतंय तरी काय?

अजित झळके - शैलेश पेटकर
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

उत्तर शिवाजीनगरमधील वधू-वर  सूचक केंद्र हे फसवणुकीचा अड्डा असल्याचे  दर्शविणाऱ्या साऱ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी दिसत होत्या. इथल्या भानगडी कधीतरी बाहेर येणार, हे तिथलं वातावरणच सांगत होतं अन्‌ दोन दिवसांपूर्वी पहिला  गुन्हा दाखल झाला. आता तरी या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिसांनी जावं.

बेल वाजवली... पॉश अपार्टमेंटमधील फ्लॅटचा दरवाजा उघडला. आतला नजारा शंकांचे काहूर माजवणारा होता... वधू-वर सूचक केंद्र नव्हे ही तर अलिबाबाची गुहाच... भिंतीवर भलेमोठे लग्न समारंभाचे इंटरनेटवरून शोधून छापलेले पोस्टर अन्‌ खाली सोफ्यावर पान चघळत बसलेल्या महिला... काऊंटरवर तीन-चार तरुणी... उत्तर शिवाजीनगरमधील वधू-वर  सूचक केंद्र हे फसवणुकीचा अड्डा असल्याचे  दर्शविणाऱ्या साऱ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी दिसत होत्या. इथल्या भानगडी कधीतरी बाहेर येणार, हे तिथलं वातावरणच सांगत होतं अन्‌ दोन दिवसांपूर्वी पहिला गुन्हा दाखल झाला. आता तरी या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिसांनी जावं.

सांगलीतील उत्तर शिवाजीनगरात एका अपार्टमेंटमध्ये एक वधू-वर सूचक केंद्र सुरू आहे. तिथे आमच्या एका मित्राला काही बरा अनुभव आला नाही.  संशयास्पद मामला आहे... जरा बघा...’’ महिन्यापूर्वी एका वाचकाने हिंट दिली. त्या केंद्राचं ‘स्टिंग’साठी म्हणून गेलो होतो. सध्या त्याचा विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता तक्रारदारींची रीघ लागलीय, याकडे केवळ फसवणुकीचे प्रकरण असं न पाहता त्यापलीकडे काही असावे, असे स्पष्ट संकेत आहेत. ते पोलिसांनी  आता शोधलेच पाहिजे.

पतसंस्थेत शिपाई असलेला तरुण केंद्रात गेला. नाव नोंदवलं. दुसऱ्या दिवशी फोन आला. मुलगी आहे, पहायला या. मुली भेट घडवली. म्हणे, मुलगी एकुलती एक आहे... मुंबईची आहे. फ्लॅट आहे, आईसोबत राहते... घरजावई हवाय. रग्गड पैसा आहे, बसून खाल्ला तरी चालेल. गडी पुरता भाळला. मुलगी पसंत पडली. पुढची बोलणी करायला मित्र किंवा पाहुण्याला घेऊन येतो म्हणून तो बाहेर पडला. त्याआधी सहा हजार रुपये भरा, असे सांगण्यात आले. 

आता एवढी प्रॉपर्टी अन्‌ एकुलती एक मुलगी मिळतेय म्हटल्यावर गड्याने पैसे भरून टाकले. काही दिवसांनी मित्राला सोबत घेऊन स्वारी दाखल. पण, मित्र शहाणा होता. त्याने एका नजरेत ओळखले. इथं सारा बाजार आहे. बकरा शोधला जातो अन्‌ हेरून कापला जातो. कुणी जास्त ओरडले तर त्याला काहीतरी इलाज केला जातो... तो इलाज काय, तर विनयभंगाचा गुन्हा. हे केंद्राबद्दल दाखल झालेल्या पहिल्या तक्रारीतून आता पुढे आले आहे. 

आम्ही गेलो तेव्हा त्या मित्राने सांगितलेली सारी माहिती तंतोतंत जुळून आली. स्वागताला तीन-चार मुली होत्या. काही महिला पान खावून बसल्या होत्या... त्यांचं ते दिसणंच संशयाला वाव देणारे. इथे काहीतरी ‘भलतेच’ चालत असावे असे शंकास्पद वातावरण. मित्राचे नाव नोंदवायचे आहे असे सांगून आम्ही प्रवेश मिळवला. दोन तरुणींनी आतील बाजूच्या कक्षात नेले. त्या खुर्चीवर विराजमान झाल्या, आम्ही समोर बसलो... टेबलवरच्या काचेखाली पन्नासेक फोटो... इच्छुक वधूंचे... त्यात एकाही मुलाचा फोटो नाही... साऱ्या मुली अन्‌ महिलाच. काहींच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. आम्ही विचारलं,  ‘‘ह्यांचं लग्न करायचं आहे ना, मग दाखवायला गळ्यात मंगळसूत्र असलेला फोटा का दिलाय?’’ आमच्या शंकेमुळे ती तरुणी सावध झाली, पण बहुदा ‘ट्रेंड’ असावी... ‘‘त्यांचा पुनर्विवाह करायचा आहे...’’ असं सांगून तिनं वेळ मारून नेली. ते फोटो कशासाठी होते? याचा उलगडा पोलिसांनी मनावर घेतला तर होईलही. कारण, ते फोटो निश्‍चितपणे इच्छुक वधूंचे होते का,  अशी शंका घ्यायला वाव आहे. ते फोटो अन्य कारणासाठी वापरले जात होते का? 

त्या फ्लॅटच्या दुसऱ्या बाजूला एक खोली आहे. तेथे वावर होता, मात्र नवख्याने तिकडे फिरकू नये, अशीही व्यवस्था होती. त्यांनी नाव नोंदवून घेतलं. दोन दिवसांत जयसिंगपूरच्या मुलीची भेट घडवू, असं सांगितलं. सहा हजार रुपये फी भरा, पहिल्या भेटीआधी किमान ३ हजार भरावे लागतील, असंही सांगितलं. दोन दिवसांनी फोन आला, मुलगी आलीय, भेटायला या...

भेटीसाठी गेलो, मात्र पैसे भरले नाहीत... जोवर पैसे भरत नाही तोवर भेट नाही, असे सांगितले गेले... आम्ही तिथं नाद सोडला.
आजूबाजूला या केंद्राविषयी चौकशी सुरू केली.  साऱ्यांची एकच प्रतिक्रिया... काहीतरी भानगड आहे. नेत्याच्या मुलाने तर तिथे दंगा घातला. कारण त्याच्या एका कार्यकर्त्याला असेच लुटले म्हणून. एका बड्या पोलिस अधिकाऱ्याला या केंद्राची माहिती दिली. त्यांच्याकडूनही थंडा प्रतिसाद. केंद्राचे बिंग फुटायला  एका तक्रारदाराची गरज होती. सलगरेच्या तरुणाने ती दिलीय. आता तरी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला हवे. कारण हे प्रकरण विवाहेच्छुकांच्या फसवणुकीपलीकडचे आहे.

Web Title: Sangli News Bride-groom cheating center