सांगलीतील राजकिशोर वधू-वर केंद्राला टाळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

सांगली - वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली शेकडो लोकांना हजारो रुपयांची टोपी घालणाऱ्या येथील उत्तर शिवाजीनगरमधील राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राला अपार्टमेंटमधील रहिवाशांनी टाळे ठोकले. 

सांगली - वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली शेकडो लोकांना हजारो रुपयांची टोपी घालणाऱ्या येथील उत्तर शिवाजीनगरमधील राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राला अपार्टमेंटमधील रहिवाशांनी टाळे ठोकले. पुन्हा केंद्र उघडाल तर गाठ आमच्याशी आहे, असे ठणकावत फ्लॅटमालकास निर्वाणीचा इशारा दिला. सकाळी केंद्र उघडण्यासाठी आलेला केंद्रचालकाचा  मुलगा आणि भावाने या रुद्रावतारापुढे नमते घेत इथले केंद्र बंद करतो, असे कबूल केल्यानंतर लोक शांत  झाले. 

उत्तर शिवाजीनगरमध्ये चालवल्या जाणाऱ्या या केंद्रात फसवणूक झाल्याची पहिली फिर्याद विश्रामबाग पोलिसांत दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची रीघ लागली आहे. ‘सकाळ’ने केंद्रात केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून निदर्शनास आलेल्या संशयास्पद बाबी समोर आणल्या. त्यामुळे शहरात या केंद्राची चर्चा आणि संताप आहे. पोलिसांनी मात्र अद्याप त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर

फ्लॅटधारकांनीच एकत्र येऊन केंद्र बंद होईपर्यंत लढ्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी या लढ्याला पाठबळ दिले. त्यांनी स्वतः केंद्रात जाऊन तिथली परिस्थिती चव्हाट्यावर आली. 
शिव ऑर्नेड अपार्टमेंटमधील नागरिकांनी केंद्रातील फसवणुकीविषयी वर्तमानपत्रात छापून आलेल्या  बातम्यांचे कात्रण काल रात्री प्रवेशद्वारावर लावले. ते केंद्रचालकाच्या मुलाने आज सकाळी पाहिले. ते फाडण्याचा प्रयत्न तो करत असताना रहिवाशांनी त्याला अडवले. त्यानंतर दंगा होण्याची चिन्हे दिसू लागताच त्याने मित्रांना बोलावून घेतले. लोकही जमा झाले. नागरिकांनी पृथ्वीराज पवार यांना बोलावून घेतले. त्यांच्यासह महिला आघाडीच्या रेखा पाटील व महिलांची टीम तेथे आली. त्यांनी या मुलाला धारेवर धरले. ‘भिंतीआड काय चालते?’ याचा पर्दाफाश करण्यासाठी कुलूप उघडण्याची तंबी दिली. तो उघडत नाही  म्हटल्यावर लोकांनी ते तोडून टाकले. केंद्रात बऱ्याच संशयास्पद बाबी दिसून आल्या. येथे मुलींचे तीन जोड जुने तर एक नवा कोरा ड्रेस आढळून आला. पैकी एक ड्रेस सोनेरी रंगाचा असून ऑर्केस्ट्रामध्ये वापरतात, तशा प्रकारचा झगमगीत होता. एक सॅंडल जोडही आढळून आले. 

अनेक मुलींचे फोटो होते. त्यात काही मुलींच्या गळ्यात मंगळसूत्रही होते. काही वयस्कर विवाहेच्छुकांचे फोटो आढळले. सीसीटीव्हीचे फुजेट मात्र डिलीट केल्याचे निदर्शनास आले.
या केंद्रात सारेच संशयास्पद असून फसवणुकीच्या तक्रारींची जिल्हा पोलिस प्रमुखांनी त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी करत अपार्टमेंटमधील नागरिकांनी अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्याकडे केली. दरम्यान, या केंद्राचा चालक इकडे फिरकला नाही.  त्याच्या मुलाने सुरवातीला अरेरावीची भाषा वापरण्याचा प्रयत्न केला, मात्र आजवर शांत असलेल्या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तो वरमला.

टोपी दोनशेची अन्‌ ५७ हजार रुपयांची
सकाळी गोंधळ सुरू असताना फसले गेलेले दोन ‘वर’ याठिकाणी आले. पत्नीचे निधन झाल्यानंतर पुनर्विवाहाला त्यांनी नावनोंदणी केली होती. एकजण साठी पार केलेला होता. त्याला २० वर्षांची मुलगी दाखवली अन्‌ लग्नाचा निर्णयही पक्का झाल्याचे भासवले गेले. त्याने केवळ २०० रुपये भरले होते, हे सुदैव. दुसऱ्याची कथाही अशीच, मात्र ते तब्बल ५७ हजार रुपयांना लुटले गेले आहेत. त्यांची जोडी निश्‍चित झाली होती, मात्र केंद्रावर गुन्हा दाखल झाला अन्‌ ‘ती’चा मोबाईल स्वीच ऑफ लागायला लागला. ती या रॅकेटचाच भाग असल्याची जाणीव फसलेल्या महाशयांची झाल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटमधील नागरिकांसह पोलिस ठाणे गाठले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Bride-groom Cheating Center issue