...अन्‌ ‘ती’ जाळ्यात अडकता अडकता वाचली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

सांगली - लग्नासाठी हजारो स्थळं सुचवणाऱ्या एका ‘... डॉट कॉम’ संकेतस्थळावर तिनं नाव नोंदवलं होतं... त्यातून तिला एकानं पसंत केलं... सांगलीत घरी येऊन मागणी घातली. भेटही झाली... पुढची बोलणी अन्‌ मग लग्न ठरणार होतं... पण, त्यानं ‘मी मनसेचे मुंबईचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मुलाचा मित्र आहे...’ अशी फुशारकी मारली अन्‌ तो फसला.

सांगली - लग्नासाठी हजारो स्थळं सुचवणाऱ्या एका ‘... डॉट कॉम’ संकेतस्थळावर तिनं नाव नोंदवलं होतं... त्यातून तिला एकानं पसंत केलं... सांगलीत घरी येऊन मागणी घातली. भेटही झाली... पुढची बोलणी अन्‌ मग लग्न ठरणार होतं... पण, त्यानं ‘मी मनसेचे मुंबईचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मुलाचा मित्र आहे...’ अशी फुशारकी मारली अन्‌ तो फसला.

नांदगावकर यांना दोन मुली आहेत. मुलगा नाही, हे इथले माजी आमदार नितीन शिंदे यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याच्या हेतूबद्दल शंका आली. त्यानं दिलेल्या पत्त्यावर पोहोचण्याचा प्रयत्न केला... तर माणसाप्रमाणे पत्ताही बोगस निघाला. फसवणुकीच्या रॅकेटच्या जाळ्यात जाळ्यात अडकता, अडकता ती वाचली. 

पुण्यातील एका कंपनीत काम करणारी सीमा (नाव बदललं आहे) हिनं एका वधू-वर सूचक संकेतस्थळावर आपलं नाव नोंदवलं होतं. त्यावर हजारोंच्या संख्येने इच्छुक मुला-मुलींचे फोटो आणि माहिती असते. त्यात तिनं आई-वडील हयात नसल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे ही मुलगी सहज आपल्या जाळ्यात अडकेल, अशा अंदाजाने सागर संदीप पवार नाव सांगून एका तरुणानं तिला पसंत केलं. त्यानं मुंबईचा पत्ता दिला. तेथे एका बड्या वाहन कंपनीत बड्या पगाराची नोकरी करतो, असं सांगितलं.

नायगावला घर आहे, असा पत्ता दिला होता. पत्ता देताना चार भागातील वेगवेगळ्या ठिकाणांची नावे मिक्‍स केली होती. ही बोलणी सुरू असतानाच त्यानं नांदगावकर यांचा उल्लेख केला. या मुलीचा भाऊ नितीन शिंदे यांच्या संपर्कात असतो. त्यानं सहज शिंदे यांच्याकडे श्री. नांदगावकर यांच्या मुलाचा मित्र सीमाला पाहायला आला होता, असे सांगितले.

श्री. शिंदे यांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांनी तत्काळ मुंबईला फोन केला अन्‌ नांदगावकर यांना मुलगा नसल्याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली. त्यांना दोन मुली आहेत, मग ह्याचा मित्र कोण? हा खोटं बोलत असावा, याची खात्री झाल्यानंतर मुलीच्या भावाने मुंबई गाठली. नायगावचा पत्ता शोधायला सुरवात केली. तर बहाद्दराने दादरच्या गल्लीचं नाव, नवी मुंबईतील रस्त्याचं नाव अन्‌ नायगाव असा मिक्‍स पत्ता दिल्याचं समोर आलं. 

या काळातच त्यानं सीमाला फोन केला. ती आपल्या जाळ्यात अडकतेय, असा त्याचा पक्का समज झाला होता. पण, मुलगी चाणाक्ष होती. तिनं लग्न करू. मात्र त्याआधी तुझ्या घरच्या पत्त्यावर माझा भाऊ जाऊन खात्री करेल, तो आता मुंबईतच आहे, असे सांगितले. त्यावर तो हादरला. त्या क्षणाला त्याचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. त्याच्यासोबत मुलगी पाहायला आलेल्या तीन-चार महिलांचे फोनही स्वीच ऑफ झाले. कदाचित, ते पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता नाही. 

एकीकडे सांगलीत वधू-वर सूचक केंद्रात सुरू असलेला ‘संशयास्पद’ प्रकार आणि दुसरीकडे त्याचवेळी एका अन्य संकेतस्थळावरून मुलींना फसवणारे रॅकेट समोर आल्याने संशयकल्लोळ सुरू झाला आहे. या वाटेवर पाऊल ठेवताना सावध राहिलं पाहिजे, एवढा धडा यातून घेण्याची गरज आहे. 

Web Title: Sangli News Bride-groom Cheating Center issue