बेडग रस्त्यावरील कचरा डेपो, भस्मीकरण केंद्राच्या चौकशीचे आदेश

संतोष भिसे
बुधवार, 27 जून 2018

मिरज  - बेडग रस्त्यावरील महापालिकेचा कचरा डेपो व जैविक भस्मीकरण केंद्र यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीने पाहणी करुन दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. 

मिरज  - बेडग रस्त्यावरील महापालिकेचा कचरा डेपो व जैविक भस्मीकरण केंद्र यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीने पाहणी करुन दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. 

बेडगचे सदस्य मनोज मुंडगनूर यांनी हा प्रश्‍न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. त्याची दखल घेत चौकशी समितीचा निर्णय राऊत यांनी घेतला. गटविकास अधिकारी राहूल रोकडे अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये पशुसंवर्धन अधिकारी एस. पी. सोनवणे, तालुका अारोग्याधिकारी डॉ. विजय सावंत, विस्ताराधिकारी मगदुम आणि शामराव इंगळे यांचा समावेश आहे.

मिरजेतील कचरा या डेपोत टाकला जातो. चारशेहून अधिक दवाखान्यांमधील वैद्यकीय कचऱ्याचे भस्मीकरणही येथील केंद्रात केले जाते. या दोन्ही ठिकाणी आरोग्यविषयक काळजी घेतली जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आल्याची तक्रार मुंडगनूर यांनी केली होती.

कचरा डेपोत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद असतो. लगतच्या वस्तीतील रहिवाशांवर ते हल्ले करत असतात. काही वर्षांपुर्वी एका बालिकेचा बळीही घेतला होता. डेपोतील कचऱ्याची नियमित वेळेत विल्हेवाट किंवा लिलाव झालेला नसल्याने हजारो टन कचरा साचून आहे; त्याच्या दुर्गंधीने वड्डी, बोलवाड परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. डेपोवर गुजराण करणारी कुत्री आणि पक्षी परिसरातील शेतीचीही प्रचंड हानी करतात. 

जैववैद्यकीय भस्मीकरण केंद्रातील धुरामुळे अनेक किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरते. नियमांचे पालन केले जात नाही. येथे केंद्र असतानाही शहरातच अनेकदा वैद्यकीय कचरा ठिकठिकाणी टाकला जातो. याविषयी तक्रारी आल्याने चौकशी समितीचा निर्णय झाला. 

दरम्यान, येथील कत्तलखान्यामुळेही रहिवाशांचे आरोग्य धोक्‍यात आल्याची तक्रार आहे. तसा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ सावंत यांनी पंचायत समितीला दिला आहे. या सर्वांची चौकशी समिती करेल. 

Web Title: Sangli News CEO Abhijeet Raut order