डॉ. खिद्रापुरे: गर्भपात करायला लावून पैसे उकळणे एवढाच धंदा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

या तपासात डीएनए फिंगरप्रिंट प्रोफाईल तंत्राचा वापर करण्यात आला. त्यातून 8 अर्भकांच्या जातीचा तपास शक्‍य झाले. त्यापैकी 5 अर्भक हे पुरुष जातीचे असून 3 स्त्री जातीचे आहेत. याचा अर्थ या डॉक्‍टरांकडे एकदा का गर्भवती महिला आली की तिला मुलगी असो वा मुलगा गर्भपात करायला लावून पैसे उकळणे एवढाच धंदा होता

सांगली - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भलिंग हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह 14 जणांविरुद्ध पोलिसांनी जिल्हा न्यायालयात 1800 पानी दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे गांभिर्य लक्षात घेवून तो जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालवला जावा, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

शिंदे म्हणाले, ""स्वाती जमदाडे (रा. मणेराजुरी) या यांना दोन मुली असल्याने गर्भलिंग तपासणी करून गर्भपात केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणावरून पडदा उठला आणि 3 मार्च 2017 रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 89 दिवस अविरत तपास करून आज दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी भादवि कलम 304, 313, 315, 34 आदी 14 कलमांसह महाराष्ट्र मेकिकल प्रक्‍टीशनर ऍक्‍ट कलम 33 व 34, वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 चे कलम 5 (2), 5 (3) आणि 5 (4), तसेच ड्रग अँड कॉस्मॅटिक ऍक्‍ट 1940 चे कलम 18 (सी) 27 (बी) आदी कलमे लावली आहेत. जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेली ही कलमे आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेताना ऍड. हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली आहे. आता सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, अशी विनंती आम्ही करणार आहोत.'' 

मुख्य आरोपी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे (म्हैसाळ), मयत महिलेचा पती प्रवीण जमदाडे (मणेराजुरी), गर्भलिंग तपासणी करणारा डॉ. श्रीहरी घोडके (कागवाड) व डॉ. रमेश देवगिरीकर (विजापूर), परिचारक उमेश साळुंखे (नरवाड), परिचारिका कांचन रोजे (नरवाड), गोळ्या पुरविणारा सुनिल खेडेकर (माधवनगर), एजंट सातगोंडा पाटील (कागवाड) व यासीन तहसिलदार (तेरवाड), डॉक्‍टर-एजंट संदीप जाधव (शिरढोण), विरणगौंडा गुमटे (कागवाड), औषध वितरक भरत गटागट, औषध कंपनी प्रतिनिधी दत्तात्रय भोसले आणि गर्भाची विल्हेवाट लावणारा गवळी रवींद्र सुतार (म्हैसाळ) यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

5 पुरुष, 3 स्त्री जातीची अर्भके 
अधीक्षक श्री. शिंदे यांनी या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, ""या तपासात डीएनए फिंगरप्रिंट प्रोफाईल तंत्राचा वापर करण्यात आला. त्यातून 8 अर्भकांच्या जातीचा तपास शक्‍य झाले. त्यापैकी 5 अर्भक हे पुरुष जातीचे असून 3 स्त्री जातीचे आहेत. याचा अर्थ या डॉक्‍टरांकडे एकदा का गर्भवती महिला आली की तिला मुलगी असो वा मुलगा गर्भपात करायला लावून पैसे उकळणे एवढाच धंदा होता, हेही लक्षात घेतले पाहिजे.'' 

Web Title: sangli news: charge sheet against Dr khidrapure