छोट्या बाबर टोळीला ‘मोक्का’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

सांगली - पोलिसांनी गुंडांच्या टोळ्यांवर आपली वक्रदृष्टी वळवल्यानंतर सावंत टोळीपाठोपाठ छोट्या बाबर टोळीवरही ‘मोक्का’खाली कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत छोट्या बाबरसह त्याच्या टोळीतील आठ जणांना ‘मोक्का’ लावण्यास विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली.

सांगली - पोलिसांनी गुंडांच्या टोळ्यांवर आपली वक्रदृष्टी वळवल्यानंतर सावंत टोळीपाठोपाठ छोट्या बाबर टोळीवरही ‘मोक्का’खाली कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत छोट्या बाबरसह त्याच्या टोळीतील आठ जणांना ‘मोक्का’ लावण्यास विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी, खंडणी, दरोडा, शस्त्रे बाळगणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे आदी गुन्हे या टोळीविरुद्ध दाखल आहेत.

याबाबत अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘किरण रूपेश भंडारे (वय २०, रा. रमामातानगर, सांगली) याचा मित्र सैफ याची शंभर फुटी रोडवर रोहित बाबर आणि संतोष जाधव यांच्याशी वादावादी झाली होती. ती भांडणे किरण भंडारे याने सोडवली होती. या रागातून रोहित बाबर, राहुल बाबर, मोठ्या ऊर्फ मेघश्‍याम जाधव, बारक्‍या जाधव, शेखर माने, विनायक निकम, धनंजय भोसले, ओंकार जाधव आदींनी दुसऱ्या दिवशी किरण भंडारे, त्याचा भाऊ राहुल, मामा विकी कांबळे, चुलत भाऊ राजू सोनवणे यांना शंभर फुटी रोडवर जातीवाचक शिवीगाळ करीत कोयता, लोखंडी गज, दांडक्‍याने बेदम मारहाण केली होती. किरणच्या छोटा हत्ती रिक्षाची तोडफोड केली होती.

या गुन्ह्याच्या तपासात विक्रांत ऊर्फ छोट्या बाबर याने गुन्ह्यातील फिर्यादी किरण याला ठार करण्याचा कट रचल्याबाबत साक्षीदार कपिल शिंदे, निहाल खलिफा यांच्या तपास टिपण्णीत निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर १२० (ब) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

या टोळीविरोधात ‘मोक्का’ कायद्याच्या विविध कलमांखाली कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली. या टोळी विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी करणे, गर्दी, मारामारी करणे, खंडणी, दरोडा टाकणे, प्राणघातक हल्ला करणे आदी विविध गुन्हे आहेत. त्यामुळे टोळीतील विक्रांत ऊर्फ छोट्या शंकर बाबर (वय ४२, रा. कोल्हापूर रोड, विठ्ठलनगर, सांगली), रोहित बाबर, राहुल बाबर, मेघश्‍याम अशोक जाधव, घनश्‍याम अशोक जाधव, शेखर माने, विनायक यशवंत निकम, धनंजय ऊर्फ घना शैलेश भोसले आणि ओंकार जाधव यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास इस्लामपूरचे उपअधीक्षक किशोर काळे करीत आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजन माने, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक जीवन राजगुरू, विशाल भिसे, जावेद मुजावर, इम्रान मुल्ला यांनी भाग घेतला.

Web Title: Sangli News Chota Babar group gets 'Moka'