ते येणार नसले; तरी तुम्ही मुद्द्यावर या!

ते येणार नसले; तरी तुम्ही मुद्द्यावर या!

या शहराला पुढे नेणारा कोणी भेटला नाही. या सर्वांची चिकित्सा होऊन विश्‍वस्त कसे निवडले जावेत, नेमका यासाठी काय बदल करता येईल यासाठी उद्याच्या सांगलीचा एक रोड मॅप घेऊन चर्चा घडवून आणण्याची संधी विरोधकही गमावत आहेत.

तेच तेच कारभारी आणि तोच तोच त्यांचा घोळ पाहून हताश झाले आहेत; तर सांगलीकर म्हणतात, आम्ही जेवढा टॅक्‍स भरतो त्या प्रमाणात शुद्ध पाणी, ड्रेनेज योजना, बागा, मंडई, क्रीडांगणे अशा सुविधा मिळतील का हा इथल्या सुबुद्ध नागरिकांचा सवाल आहे. वीस वर्षे डीपी प्लॅन रखडला त्याचीही जबाबदारी घेतली पाहिजे. शहराच्या नियोजनाचे तीनतेरा वाजले असताना आता गेली वीस वर्षे ज्यांना लोकांनी सत्ता दिली, त्यांच्या उत्तरदायित्वावरही चर्चा घडवून आणली पाहिजे. ज्यांनी हे केले त्यांना या सभागृहात स्थान मिळता कामा नये. जे योग्य असतील त्यांचा जरूर विचार झाला पाहिजे. याची जबाबदारी प्रत्येक जागरुक नागरिकाची आहे. 

दारात येणाऱ्या उमेदवारालाही प्रश्‍न विचारा, त्यातून तो या शहराचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे काय, याची चाचपणी करा. एरव्ही पालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलणारे आता निवडणुकीच्या काळात मोघम बोलताहेत. महापालिकेतील घोटाळ्यांचे काय झाले याचा पत्ता नाही. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे आणि त्यांचाच पक्ष मुख्य विरोधक म्हणून पालिकेच्या मैदानात उतरला आहे. त्यांनी चार वर्षांच्या सत्तेत इथल्या लेखापरीक्षणाच्या घोषणेचे काय झाले याचेही उत्तर इथल्या आमदारांनी दिले पाहिजे. सत्ता फक्‍त बदलेल... एक पक्ष जाऊन दुसरा येईल; पण पुन्हा कारभारी मागील अनुभव देणारे किंवा तेच येणार असतील तर त्याचाही विचार झाला पाहिजे.

या वेळी प्रशासनानेही शंभर टक्‍के मतदान व्हावे यासाठी खूप चांगली जागृती सुरू केली आहे. या निवडणुकीत काही अपवाद असतील; पण कर्तृत्वाचे मेरीट लावून कोणी उमेदवार निवडले का नाहीत, असे वाटत राहते. या शहराच्या समृद्धीत अनेकांचा वाटा आहे. सांगलीला पुण्यानंतरचे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. नाट्यपंढरी आणि वैद्यकीय पंढरी अशीही ख्याती असलेली सांगली-मिरज ही शहरे आहेत.

शिक्षण, अभियंते, डॉक्‍टर्स, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रांतून काहींना संधी देण्याचे धाडस राजकीय नेत्यांनी का केले नाही? सुधीर गाडगीळ हे स्वच्छ प्रतिमेचे आमदार म्हणून ओळखले जातात. जयंत पाटील उच्चशिक्षित अभियंते आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले एक प्रतिभावान नेते म्हणून ओळखले जातात. विश्‍वजित कदम हे नवोदित आमदार असले तरी एक मोठ्या शिक्षण समूहाचे नेतृत्व ते करत आहेत. असे असताना या निवडणुकीतील सध्याच्या प्रचाराची पातळी फक्‍त यांत्रिक, तांत्रिक आणि मोठ्या आवाजात हिंदी-मराठी चोरलेल्या गाण्यांवर आपली टेप वाजवत फिरताना दिसतात. त्यात नावीन्य इतकेच, ते आता भल्या मोठ्या स्क्रीनवर दाखवले जातेय. हाच काय तो बदल.

या मुद्द्यांवर सर्वपक्षीयांनी चर्चा करावी

  •  विकास आराखड्याची किती अंमलबजावणी झाली?
  •  बीओटी भानगडीच्या फायली धूळ खात का पडल्या?
  •  वसंतदादा बॅंकेत अडकलेले ६८ कोटी पालिकेला कसे मिळणार?
  •  वाताहत झालेल्या ड्रेनेज योजनेचे उत्तरदायित्व कोणाचे?
  •  गायब झालेल्या खुल्या भूखंडाची जबाबदारी कोणाची?
  •  कारभाऱ्यांनी पालिकेच्या किती मालमत्तांची वाट लावली?
  •  मंडई, क्रीडांगणे, बागा विकसित करण्यात अडचणी कोणत्या आहेत?
  •  काळ्या खणीच्या सुशोभीकरणाचे काय झाले?
  •  शामरावनगरसह वारेमाप गुंठेवारीचे पाप कोणाचे?
  •  भूसंपादनात डल्ला मारणाऱ्यांना मोकाट का सोडले?
  •  कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे तीनतेरा का वाजले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com