विट्यात विनापरवाना खोदाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

विटा - विटा नगरपालिकेच्या हद्दीतील शिवाजीनगर आणि नेवरी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीने ओएफसी केबल टाकण्यासाठी जे खोदकाम चालू केले आहे ते बेकायदेशीर आहे. हे खोदकाम पूर्णपणे थांबवावे आणि जो ठेकेदार आहेत त्याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा

विटा - विटा नगरपालिकेच्या हद्दीतील शिवाजीनगर आणि नेवरी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीने ओएफसी केबल टाकण्यासाठी जे खोदकाम चालू केले आहे ते बेकायदेशीर आहे. हे खोदकाम पूर्णपणे थांबवावे आणि जो ठेकेदार आहेत त्याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा अशी मागणी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक अमोल बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत बाबर यांनी संबंधित काम बेकायदेशीर झाल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे, असेही सांगितले. अमोल बाबर म्हणाले, शिवाजीनगर व नेवरी रस्त्यालगत कोण खोदाई करत आहे याची माहिती घेतली असता. हे काम एका मोबाईल कंपनीकडून सुरू असल्याचे समजले. पालिका हद्दीत हे काम सुरू असून देखील सभागृहाला अथवा नगरसेवकांना याची कशी काय कल्पना नाही ? असा सवाल पालिका प्रशासनाला विचारला असता तर या कामी कंपनीने तब्बल 50 लाखाहून अधिक रक्कम पालिकेकडे भरला असल्याचे सांगण्यात आले. पण सध्या ज्या ठिकाणी खोदाई सुरू आहे तिथे मात्र खोदाई कामासाठी परवानगी घेतली नसल्याचे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले असे असेल तर हे काम तातडीने थांबवावे, अशी आम्ही मागणी केली.

त्यावर मुख्याधिकाऱ्यानी काम थांबवल्याचे आम्हाला सांगितले आहे. परंतु परवानगी न घेता कोण ठेकेदार हे काम करत होता, तसेच जी रक्कम मोबाईल कंपनीने पालिकेकडे जमा केली आहे. त्यामध्ये शहरात कोणकोणत्या ठिकाणी कामे होणार आहे. त्याचे स्वरूप काय आहे, याची माहिती कळायला हवी, अशी आमची मागणी असल्याचे नगरसेवक  बाबर यांनी सांगितले.

एका मोबाईल कंपनीने आपल्याकडे ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यांनी ज्या रस्त्यावर मागणी केली आहे. त्या  रस्त्यांचे सर्वेक्षण करून लांबी - रुंदी पाहून त्यांना आम्ही डिमांड नोटीस दिली. त्यांनी पैसे भरलेले आहेत. आता त्यांना पालिकेची सभा झाल्यानंतर मंजुरी देण्यात येईल. मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच कंपनीने त्या अगोदरच नेवरी रस्त्याचे काम सुरु केले होते, ते आम्ही थांबवले आहे. उद्या परवा सभा झाल्यानंतर या कामाला परवानगी देणार असून परवानगी न घेता काम करू नये.
- महेश रोकडे, मुख्याधिकारी

Web Title: Sangli News corporator Amol Babar press