इस्लामपुरातील ‘त्या’ भूखंड माफियांवर अखेर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

इस्लामपूर - बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून जमिनींचा खोटा मालक उभा करत दोन हेक्‍टर ४५ आर जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या येथील ‘त्या’ भूखंड माफियांवर अखेर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

इस्लामपूर - बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून जमिनींचा खोटा मालक उभा करत दोन हेक्‍टर ४५ आर जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या येथील ‘त्या’ भूखंड माफियांवर अखेर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

या बाबतचे वृत्त ‘भूखंड माफियांकडून जागामालक वेठीस, बोगस जागा मालक उभा करून जमीन विक्री’  ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध होताच सहा दिवस शहरात खळबळ माजली होती. त्याची दखल घेत अखेर इस्लामपूर पोलिसांनी त्या भूखंड माफिया टोळीसह दुय्यम निबंधक, स्टॅंप व्हेंडर यांच्यावर गुन्हा 
दाखल केला. 

प्रीती नंदराज चव्हाण (वय ४१, रा. कोल्हापूर), संजय रामचंद्र घाडगे (वय ३२, रा. पलूस), मानाजी शंकर पाटील (रा. बहे), मन्सुर आत्तार (इस्लामपूर), एजंट अमीर हवलदार (इस्लामपूर), दुय्यम निबंधक एस. एस. कोळी व स्टॅंप व्हेंडर शिवप्रसाद वसंतराव कळसकर (इस्लामपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद मूळ जमीन मालक श्रीकांत कृष्णा डांगे (वय ६५, रा. कचरे गल्ली, इस्लामपूर. सध्या रा. बांद्रा, मुंबई) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली  आहे. श्रीकांत डांगे यांची येथील पेठ हद्दीतील अभियंतानगरलगत गट नं. ६०६ मध्ये २ हेक्‍टर ४५  आर क्षेत्र आहे. त्याची सातबारालाही नोंद होती.

एजंट अमीर हवलदार याने या जमिनीचा बोगस मालक उभा करून ही जमीन प्रीती नंदराज चव्हाण व संजय रामचंद्र घाडगे यांना विकली. या सर्व व्यवहारात त्यांनी मूळ जमीन मालक श्रीकांत डांगे यांचे बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड बनवून बोगस व्यक्ती डांगे म्हणून व्यवहारात पुढे आणला. त्याच्या नावे व्यवहार करून कोट्यवधी रुपयांना ही जमीन विकली. डांगे मुंबई येथे नोकरीला असल्याने तेथेच वास्तव्यास असतात. दरम्यान नोव्हेंबर २०१७ मध्ये डांगे यांच्या नावाचे आधारकार्ड  व पॅनकार्ड त्यांच्या येथील घरी आले. त्याच्यावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो होता.

या बाबतची माहिती त्यांना त्यांचा इस्लामपूर येथील भाऊ बळवंत डांगे यांनी फोनवरून दिली. त्यानंतर श्रीकांत डांगे यांनी ५ डिसेंबर २०१७ ला अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावावर बनावट आधार कार्ड काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधितांना कळवली. १६ जानेवारीला एका दैनिकात त्यांच्या नावावरील जमिनीचा खूषखरेदीने प्रीती नंदराज चव्हाण व संजय रामचंद्र घाडगे यांच्या नावे कागद झाल्याची नोटीस प्रसिद्ध झाली. त्यांनी या बाबत  इस्लामपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन  दस्त पाहिले असता त्यांच्या जमिनीची परस्पर विक्री झाल्याचे निदर्शनास आले. श्रीकांत डांगे यांनी या नंतर इस्लामपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या बाबतचा तक्रारी अर्ज दिला. 

प्रकरण परस्पर मिटविण्याचा खटाटोप
इस्लामपूर शहरातील राजकीय व्यक्तींनी यात हस्तक्षेप करत हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा खटाटोप सुरू केला होता. अखेर या बाबतचे वृत्त २८ जानेवारीला सकाळ मध्ये प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली. इस्लामपूर पोलिसांनी डांगे यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी या व्यवहारातील भूखंडमाफिया टोळीसह दुय्यम निबंधक व स्टॅंप व्हेंडरवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सर्व संशयित फरार झाले आहेत.

Web Title: Sangli News crime against land Mafia in Islampur