सांगलीच्या पोलिस पुत्रासह दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

सांगली - मलेशियात हॉटेल मॅनेजर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वर्क व्हिसा आणि नोकरी लागेपर्यंतचा खर्च असे दीड लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार अखेर आज सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली. या प्रकरणी पोलिस पुत्र कौस्तुभ सदानंद पवार आणि त्याचा सहकारी धीरज पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सांगली - मलेशियात हॉटेल मॅनेजर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वर्क व्हिसा आणि नोकरी लागेपर्यंतचा खर्च असे दीड लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार अखेर आज सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली. या प्रकरणी पोलिस पुत्र कौस्तुभ सदानंद पवार आणि त्याचा सहकारी धीरज पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

"सकाळ'ने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. कोल्हापूर, सोलापूर, नगर, जळगाव आणि सातारा या जिल्ह्यांतील तरुण यात अडकले आहेत. त्यातील चौघांना मलेशियातील अटक झाली आहे. ते सध्या जेलमध्ये आहेत. याबाबत शहर पोलिस ठाण्यात एका तरुणाचे नातेवाईक नामदेव लक्ष्मण कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. 

या बाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी  नामदेव कुंभार (रा. पेठ, इस्लामपूर, जि. सांगली) यांचे मेहुणे गुरुनाथ इराण्णा कुंभार (वय 20, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट जि. सोलापूर) यांनी कऱ्हाड येथील साई सम्राट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये हॉटल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्या दरम्यान त्यांची ओळख तेथील शिक्षक कौस्तुभ सदानंद पवार (रा. शिवराज कॉलनी, वसंतदादा सूत गिरणीजवळ कुपवाड रोड, सांगली) याच्याशी झाली होती. एप्रिलमध्ये कौस्तुभ पवारने गुरुनाथला मलेशियात हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीस लावतो, असे सांगितले.

यापूर्वी शंभर मुलांना तेथे नोकरीस लावले असून माझ्यावर विश्‍वास ठेवा, असे तो म्हणाला होता. त्यानंतर गुरुनाथने नामदेव कुंभार यांच्यासह कौस्तुभची भेट घेतली. त्याने मलेशियाला जाण्यासाठी व दोन वर्षांचा व्हिसा तसेच नोकरी लागेपर्यंतचा खर्च म्हणून दीड लाख रुपये लागतील, असे सांगितले. 

गुरुनाथने जूनमध्ये एकदा 50 हजार रुपये स्वत:च्या बॅंक अकाउंटमधून, त्यानंतर वडील इराण्णा यांच्या बॅंक अकाउंटमधून 60 हजार रुपये कौस्तुभच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. तर 40 हजार रुपये रोख दिले. 20 ऑगस्टला रोख रक्कम मिळाल्यानंतर त्याच दिवशी आणखी तीन मुलांसह गुरुनाथला कौस्तुभने ट्रॅव्हल्सने तिरुचिरापल्ली येथे पाठवले आणि तेथून विमानाने मलेशियाला पाठवले. सांगलीत एस.टी. स्टॅंडसमोरच्या लक्ष्मी हॉटेलमध्ये त्यांच्यात बैठका झाल्या होत्या. 

गुरुनाथ मलेशियाला पोचल्यानंतर वीस दिवसांनी त्याला एका हॉटेलमध्ये वेटरचे काम मिळाले; पण व्हिसा मिळाला नसून कौस्तुभ टाळाटाळ करत असल्याचेही त्याने कुटुंबीयांना सांगितले. नामदेव कुंभार यांनी त्याला विचारले असता, व्हिसा तयार झाला आहे. मलेशियाच्या एजंटच्या ऑफिसमध्ये पोचला आहे. तो गुरुनाथच्या कामाच्या ठिकाणी पोच होईल, असे त्याने सांगितले. त्यानंतर वेळोवेळी त्याला विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. 

गेल्या महिन्यात 13 नोव्हेंबरला कौस्तुभने नामदेव कुंभार यांना फोन करून गुरुनाथला इमिग्रेशन ऑफिसला चौकशीसाठी नेले आहे. त्यामुळे त्याचा संपर्क होणार नाही, असे सांगितले. पाच दिवसांनी गुरुनाथचा मित्र प्रशांत बंदीचौंडे यांचा मलेशियावरून फोन आला आणि त्याने सांगितले की गुरुनाथ आणि इतर तिघांना वर्क व्हिसा नसल्याने पोलिसांनी पकडून नेले आहे. त्यानंतर पवारला याचा जाब विचारला असता त्याने तेथील एजंट जिवाशी बोलणे झाले असून गुरुनाथ व इतरांना वकील दिला आहे. ते दोन दिवसात सुटतील, असे सांगितले. पण त्यानंतर त्याचा फोन स्वीच ऑफ लागू लागला. 

यानंतर कौस्तुभ पवारच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. त्याच्याकडून मलेशियातील एजंट जिवाशी संपर्क साधला असता त्याने कौस्तुभने व्हिसाचे पैसे दिले नसल्याचे सांगितले. कौस्तुभला याचा जाब विचारला असता त्याने पैसे देतो व मुलानांही परत आणतो असे सांगितले. मात्र अद्यापपर्यंत मुले परत आलेली नाहीत. 

गुरुनाथ कुंभारसह मोहन अशोक शिंदे (रा. बेलवंडी, ता. कर्जत, जि. नगर), दीपक लिंबाजी माने (रा. हुन्नर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि सदानंद धनगर (रा. जवळगाव) यांचीही कौस्तुभ पवारने फसवणूक केली आहे. या सर्वांना मलेशिया पोलिसांनी अटक केली असल्याचे नामदेव कुंभार यांनी सांगितले. या प्रकरणात तरुणांना भारतीय दूतावासच मदत करू शकतो, असे ते म्हणाले. 

कौस्तुभ पोलिस पुत्र 
कौस्तुभ पवार याचे वडील सदानंद पवार पोलिस दलात आहेत. ते इस्लामपूर येथे सेवेत आहेत. सध्या ते दोन महिने रजेवर आहेत. 

आणखी पंधराजण लपून बसले 
कौस्तुभ पवार याने एकूण 15 ते 20 जणांना पाठवले आहे. त्यातील चौघांना मलेशिया पोलिसांनी अटक केली आहे. इतर तरुण पोलिसांना सापडले नाहीत. त्यानंतर हे सर्वजण विविध ठिकाणी बांगलादेश, नेपाळच्या तरुणांच्या रुमवर लपून रहात आहेत. "आम्हाला कधीही पोलिस पकडतील; आम्हाला सोडवा' अशी विनंती ते फोनवर नातेवाईकांशी करत आहेत. 

नेमका कितीचा गंडा? 
कौस्तुभ पवारने प्रत्येक तरुणाकडून दीड लाख ते दोन लाख रुपये घेतले आहेत; मात्र त्यांच्या व्हिसाचे पैसे मलेशियातील एजंटला दिलेले नाहीत. त्यामुळे हा गंडा नेमका कितीचा आहे, ते स्पष्ट झालेले नाही. आटपाडीतील एकाने त्याच्याकडे 60 हजार रुपये दिले; पण तो तरुण आता सावध झाला आहे. 

कौस्तुभ चार दिवसांपासून पसार 
या प्रकरणातील मुख्य संशयित कौस्तुभ पवार गेल्या चार दिवसांपासून गायब आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याला वडिलांनीच जाब विचारला. त्यानंतर तो वडिलांना सांगून घरातून बाहेर पडला आहे. त्याचा सहकारी धीरज पाटील याचाही मोबाईल स्वीच ऑफ आहे; पण कॉल डिटेल रेकॉर्डवरून त्यांचा शोध घेत आहोत, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. 

संबंधीत बातम्या..

Web Title: Sangli News crime case against police son