आरोपींना फाशीच होईल असा तपास - केसरकर

आरोपींना फाशीच होईल असा तपास - केसरकर

सांगली - अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीच होईल, अशा पद्धतीने तपास करून भक्कम पुरावे शासन न्यायालयात सादर करेल. या प्रकरणी जे दोषी आहेत, त्या सर्वांची चौकशी केली जाईल. त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर उपाधीक्षक दीपाली काळेंच्याही चौकशीचे आश्‍वासन त्यांनी कोथळे कुटुंबीयांना दिले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, अधीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

अनिकेत कोथळे याला हैवान पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून मारले. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी अनिकेतचा मृतदेह आंबोलीत नेऊन एकदा नव्हे, तर दोनदा जाळला.
या प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली. कोथळे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर श्री. केसरकर म्हणाले, ‘‘ही घटना वाईट आहे. शासनाकडून गांभीर्याने नोंद घेतली आहे. यात जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करूच, असे प्रकार पोलिस दलात घडू नयेत यासाठी प्रयत्न करू. अनिकेतच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची भूमिका राहील. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपलब्ध असतील तर त्यांनाच नेमण्यात येईल.’’

उपनिरीक्षक युवराज कामटेबद्दल अनेक तक्रारी येऊनही त्याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याबद्दल बोलताना  ते म्हणाले, ‘‘स्थानिक यंत्रणेत असणारे दोष सुधारले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करू. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना पाठवून जिल्हा पोलिस दलात असणाऱ्या त्रुटींची चौकशी केली जाईल. जे दोषी असतील त्या सर्वांची चौकशी होईल. या घटनेच्या तपासाचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाईल.’’

कोथळे कुटुंबीयांनी अनिकेतचा सुपारी देऊन खून झाल्याबाबत दिलेल्या निवेदनाची सत्यता पडताळून चौकशी करू, अशी ग्वाही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली. सर्व पक्षीय कृती समितीची या वेळी त्यांनी भेट घेतली. समितीने त्यांना कोथळे प्रकरणी निवेदन दिले. समितीने उद्याचे बंद आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. या वेळी पृथ्वीराज पवार, महेश खराडे, सतीश साखळकर, उमेश देशमुख, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.

दीपाली काळे यांचा कामटेवर अतिविश्‍वास - कुटुंबाचा आरोप
पोलिस उपाधीक्षक काळे यांनी सातत्याने दिशाभूल केली आहे. त्यांनी कामटेवर अतिविश्‍वास दाखवला. त्यामुळे त्यांचाही यात सहभाग असल्याची शक्‍यताही कुटुंबीयांनी व्यक्त केली. केसरकर म्हणाले,‘‘सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांचीही चौकशी केली जाईल. दोषी असल्यास नक्कीच कारवाई केली जाईल.’’ त्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचाही माना झुकल्या होत्या.

तत्काळ आढावा
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर आज सांगली दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पोलिस, हैवानांपेक्षाही भयंकर...’ हे वृत्त पाहिले. त्यातील पोलिसांच्या कारनाम्यांची माहिती वाचल्यानंतर तत्काळ आढावा बैठक घेतली. 

कुटुंबाला मदत - केसरकर
‘‘केसरकर यांनी सांगितले, अनिकेतच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना मदत लवकरच जाहीर केली जाईल.’’

`पोलिस ठाण्यासमोर जाळून घेऊ`
गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज अनिकेत कोथळेच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी सारी हकिगत त्यांच्याकडून ऐकून घेतली. तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. अनिकेतचा मृतदेह अद्यापही ताब्यात दिला नाही. डीएनए टेस्टमध्येही टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास साऱ्या कुटुंबासह पोलिस ठाण्यासमोर जाळून घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. `पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या खूनप्रकरणातील दोषींची गय करणार नाही. तुम्हाला नक्कीच न्याय दिला जाईल,` असे आश्‍वासन मंत्री केसरकर यांनी अनिकेतच्या कुटुंबीयांना दिले.   श्री. केसरकर म्हणाले, ‘‘पोलिस तपासाला गती येण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांना लाजवणारा हा प्रकार आहे. यातील दोषींची गय करणार नाही.’’ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, नगरसेवक शेखर माने, पृथ्वीराज पवार, गौतम पवार, उपमहापौर विजय घाडगे, दिगंबर जाधव यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सांगली ‘बंद’ची हाक
खाकी वर्दीतील गुंडांनी चोरीच्या आरोपातील संशयित अनिकेत कोथळेचा खून केला. उद्या त्यांच्या तावडीत आणखी कुणाचा तरी अनिकेतसारखा ‘बळी’ जाऊ शकतो. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी शहरात उद्या (ता. १३) सर्वपक्षीय कृती समितीने ‘शहर बंद’ची हाक दिली आहे. शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहणार आहेत. बंदमध्ये सहभागी होऊन सांगलीकरांनी अनिकेतला श्रद्घांजली वाहावी आणि पोलिसांच्या कृत्याचा निषेध करावा, असे आवाहन समितीने केले आहे.

बेकर मोबाईल व्हॅनसह तीन वाहने जप्त
पोलिस कोठडीतीत अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली पोलिस दलाची बेकर मोबाईल व्हॅन, मोटार तसेच दुचाकी अशी तीन वाहने सीआयडीने जप्त केली. 

चोरीचा गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी थर्डडिग्रीचा वापर करून अनिकेतला बेदम मारहाण केली.  त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोलीच्या जंगलात दोनवेळा जाळण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकरणात पोलिसांच्या बेकर मोबाईल व्हॅनमधून अनिकेतचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढला. तेथून तो शासकीय रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र तेथे कुणी सहकार्य केले नाही. पहाटे चारपर्यंत बेकर मोबाईल व्हॅनमधून मृतदेह घेऊन संशयित पोलिस फिरत होते. यानंतर आंबोली येथे मृतदेह जाळण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर मृतदेह नेण्यासाठी हवालदार अनिल लाडची मोटार गाडी आणली. अंकली-हरिपूर रस्त्यावर बेकर मोबाईल व्हॅनमधून अनिकेतचा मृतदेह या गाडीत ठेवण्यात आला. तत्पूर्वी नसरुद्दीन मुल्लाच्या मोटारसायकलीवरून अमोल भंडारेला घेऊन कृष्णा नदीच्या घाटावर गेला होता. सीआयडीने तपासात या तीनही वाहनांना ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा करून जप्त केले.

अमोल भंडारेलाही मारण्याचा होता कट

अनिकेत कोथळेला थर्ड डिग्रीत कसे मारले, याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या अमोल भंडारे याचाही गेम करण्याचा कट पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेने रचला होता; मात्र अरुण टोणेने त्याला विरोध केला. त्यामुळे तो वाचला, अशी धक्कादायक माहिती सीआयडी तपासात समोर आली आहे.

चाकूचा धाक दाखवून संतोष गायकवाड यांना लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत चौकशी करताना थर्ड डिग्री वापरल्याने मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आंबोलीच्या जंगलात जाळून टाकण्याचाही प्रयत्न झाला. त्याची सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे.
अनिकेत कोथळे व अमोल भंडारे शहर पोलिसांच्या कोठडीत असताना कामटे आणि त्याचे साथीदार हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी डीबी रूममध्ये चौकशीसाठी घेऊन दोघांना बेदम मारहाण केली. अनिकेतला छताला उलटे टांगून ‘थर्ड डिग्री’चा वापर केला. यात त्याचा मृत्यू झाला. ही सर्व घटना अमोलसमोर घडली. भंडारेला सोडले तर सर्वजण अडकू शकतो असे कामटे म्हणाला; पण अरुण टोणेने अनिकेतचे प्रकरण अंगलट आले आहे, भंडारेला मारून आणखी गोत्यात येऊ शकतो, असे सांगत विरोध केला; त्यामुळे कामटे गप्प बसला. 
कामटेने भंडारेला, ‘हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुलाही मारून टाकेन,’ अशी धमकी दिली. त्यामुळे भंडारे भीतीने हात जोडून ‘नाही साहेब,’ असे म्हणाला, अशी माहिती सीआयडीच्या चौकशीतून पुढे आली आहे. त्यामुळे सीआयडीचे पथक न्यायालयीन कोठडीत असलेल्या भंडारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्‍यता आहे.

अधिकारीही तणावात
कोथळेचा थर्ड डिग्रीत मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पोलिस अधिकारीही तणावात होते. कामटे आणि इतर भंडारेलाही मारून टाकतील की काय, अशी भीती त्यांना होती. कामटेसह इतरांनी त्याला मारून टाकण्याची धमकी दिल्याने तो परत आल्यानंतर बराच वेळ काही सांगत नव्हता. ‘आम्ही पळून गेलो होतो,’ असेच सांगत होता; मात्र त्याला काही होणार नाही, असा विश्‍वास दिल्यानंतर त्याने अनिकेतला कसे मारले याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com