श्‍वानप्रेमींचा श्‍वानांसह महापालिकेवर मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सांगली - पाळीव श्‍वानांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये कर द्यावा, असा अजब ठराव महासभेत आणला आहे. त्याच्या निषेधार्थ श्‍वानप्रेमी आणि नागरिकांनी श्‍वानांसह महापालिकेवर मोर्चा काढला. नगरसेवक शेखर माने यांच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला. हा अन्यायी कर रद्द करावा, अन्यथा महासभेत श्‍वान सोडले जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना देण्यात आले. 

सांगली - पाळीव श्‍वानांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये कर द्यावा, असा अजब ठराव महासभेत आणला आहे. त्याच्या निषेधार्थ श्‍वानप्रेमी आणि नागरिकांनी श्‍वानांसह महापालिकेवर मोर्चा काढला. नगरसेवक शेखर माने यांच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला. हा अन्यायी कर रद्द करावा, अन्यथा महासभेत श्‍वान सोडले जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याबाबतचे निवेदन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना देण्यात आले.

राजवाडा परिसरातून दुपारी बारा वाजता श्‍वानप्रेमींनी श्‍वानांसह मोर्चा काढला. प्रत्येकाच्या हातात निषेधाचे फलक होते. "अन्याय का?' असा घोषणा देण्यात आल्या. श्‍वानांसह पहिलाच मोर्चा असल्याने परिसरातही बघ्यांची गर्दी होती. त्यानंतर पालिकेत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. राज्यात किंबहुना देशात कोठेही इतका मोठा कर पाळीव श्‍वानांसाठी घेतला जात नाही, सांगली महापालिकेने कोणत्या आधारा हा कर ठरवला, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

यावेळी आयुक्तांनी श्‍वानप्रेमींची बैठक घेतली. श्‍वान प्रेमींच्या भावनांचा विचार केला जाईल. महासभेत जो निर्णय होईल, त्याची प्रशासन अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. 

यावेळी आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, अॅनिमल सहाराचे अध्यक्ष अजित काशीद, सतीश वाघमारे, रोहन आपटे, गजानन कसबे, प्रशांत वायदंडे, रोहित बन्ने, विनायक बावदनकर, संदीप होरे, एम. डी. बोकील, सागर भुसारी, जयवंत माळी, संदीप भोरे, प्रशांत मातंग, महेश माने, मुस्तफा मुजावर, सचिन शिंगारे, उदय पुजारी, रोहित अंकलगी उपस्थित होते. 

स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत अनेक त्रुटी समोर आल्यानंतर शहरातील श्‍वानांबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मोकाट श्‍वानांबरोबर मालकांनी श्‍वान असेच रस्त्यावर सोडून दिल्याचे दिसून आले. गेल्या चार महिन्यात मिरज शहरात तब्बल 206 जणांना श्‍वानांमुळे इजा झाली. यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी या कर आकारण्यात आला होता. परंतू श्‍वान प्रेमींच्या मागणीनुसार त्याचा महासभा जो निर्णय घेईल, त्याची प्रशासनाकडून अंमलबाजवणी केली जाईल.
- रवींद्र खेबुडकर,
 
आयुक्त, सांगली 

मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्याऐवजी जाचक करा आकारण्याचा निर्णय होत आहे. या कर आकारणीमुळे श्‍वानप्रेमींना पालिका काय सुविधा देणार, हे जाहीर करायला हवे होते. राज्यात अन्यत्र कोणत्याही महापालिकेने इतका कर आकारलेला नाही, सांगलीत कोणत्या आधारे हा कर आकारला, याचे प्रशासनाकडे उत्तर नाही. येत्या महासभेत याविरोधात आवाज उठवू. 
- शेखर माने, 

नगरसेवक. 

पाळीव श्‍वानांसाठी इतका कर आकारणी केली आहे, त्याला आमचा विरोधच असेल. नोंदणीसाठी नाममात्र शुल्क देण्यास आमचा विरोध नाही. त्याबदल्यात सुविधाही द्यायला हव्यात. मोकाट श्‍वानांसाठी आम्ही सर्व श्‍वानप्रेमी महापालिकेला सहकार्य करु.
- अजित काशीद,
श्‍वानप्रेमी. 

Web Title: Sangli News Dog lovers march on Corporation