दुष्काळप्रश्‍नी काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

बागायत क्षेत्रही संकटात - भाजपच्या आमदारांची सिंचन योजनांसाठी केवळ धावपळ 
सांगली - जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. दुष्काळी टापूत १४० टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. दुष्काळाचे संकट गडद होतेय. बागायती पिकेही संकटात आहेत. अशावेळी टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चकार शब्द काढलेला नाही. उलट सत्ताधारी भाजपच पाणी देणार देणार म्हणून टेंभा मिरवत आहे.

काँग्रेसने अलीकडेच ‘इंदू सरकार’ सिनेमाविरुद्ध आणि राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ दोनवेळा आंदोलन केले. राष्ट्रवादीची दुसरी, तिसरी फळी छोट्या-मोठ्या विषयांवर निदर्शने करताना दिसतेय, मात्र त्यांचा लेखी दुष्काळ हा काही महत्त्वाचा विषय दिसत नाही.ताकारी-म्हैसाळ योजनेतून तासगाव, कवठेमहांकाळ, म्हैसाळ योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत, टेंभू योजनेतून खानापूर, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील क्षेत्र ओलिताखाली येते. या तालुक्‍यातील यंदाची सरासरी पावसाची आकडेवारी ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. टंचाई स्थितीचा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.

या तालुक्‍यांतील पिकांना पाणी कमी पडतेय, पिके संकटात आहेत, असा अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. पाऊस आणि टॅंकरचे आकडे राज्य शासनाकडे टंचाई निधीतून उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी करायला पुरेसे आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे सातही तालुक्‍यातील नेते कमी पडत आहेत. राज्यात सत्ता जाऊन तीन वर्षे व्हायला आली तरी ‘विरोधक’ असल्याची जाणीवच काँग्रेसजणांना झालेली नाही. सांगोला तालुक्‍यातील नेत्यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांना गाठून मुंबईत मुख्यमंत्र्यांसमेवत बैठक घेतली. तेथे जिल्ह्यातील आमदारांनी हजेरी लावली, मात्र स्थानिक प्रश्‍न केंद्रस्थानी आलेच नाहीत. त्यामुळे दुष्काळी टापूतील बागायती पिकांवरील संकट आणखी गडद होत आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार टंचाई प्रश्‍नावर ‘मार्केटिंग’साठी सरसावले आहेत. आमदार सुरेश खाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई स्थितीचा सविस्तर अहवाल मिळवला. सोबत भाजपच्या एका समितीने पाण्यासाठी दिलेले निवेदन जोडून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी पाठपुरावा सुरू केला. 

पाऊस टक्केवारीत
मिरज-४२, जत-६३ टक्के, खानापूर-४३, तासगाव-३५, आटपाडी-९५, कवठेमहांकाळ-७६, कडेगाव- ६५, जिल्ह्याची सरासरी पाऊस ६४ टक्के आहे. अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाने अहवाल मागवून घेतले आहेत. त्यांनी येथे बागायती पिके धोक्‍यात असून, उपसा सिंचन योजना सुरू करणे अत्यावश्‍यक असल्याचा अहवाल दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही जिल्ह्यातील गंभीर स्थितीचा अहवाल नियमितपणे राज्य  शासनाकडे पाठवला जात आहे. सिंचन योजनांचे वीज बिल थकबाकी अशी - म्हैसाळ- २८ कोटी, टेंभू- १५ कोटी.

Web Title: sangli news drought issue in sangli