इयरफोनवाले बेफाम...कानगड्डा धरण्याची वेळ !

शैलेश पेटकर
गुरुवार, 3 मे 2018

सांगलीतील उदाहरणं 

  •  विश्रामबाग रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू 
  •  त्याच ठिकाणी चाळीस वर्षांच्या व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

उत्तर प्रदेशात इअरफोन वापरून स्कूलबस चालवताना रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सांगलीत एका तरुणासह दोघांना जिवाला मुकावे लागले. असंख्य लोक या कारणाने अपघातात जायबंदी होत आहेत. तंत्रज्ञानाचा घातकी वापर जिवघेणा ठरत असताना शहाणपण मात्र येत नाही, हे खरे ठरत आहे. त्यामुळे अशा बेफाम वाहनधारकांविरुद्ध कडक कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

कायदा मोडण्यात शौर्य मानणारी तरुणाई इअरफोन घालून वाहन चालवणे या टाळता येण्याजोग्या कारणास्तव जिवाला मुकतेय. रस्त्यावरच्या जीव धोक्‍यात असलेल्या अशा तरुणांचे स्थान वरचे आहे. त्यांना रोखलेच पाहिजे, अन्यथा ते स्वतःसह इतरांच्या जिवाशीही खेळत राहतील. त्यात तरुणींची संख्या अधिक असल्याचे पोलिसांचेच निरीक्षण आहे. 

वाहन चालवताना मोबाईल, इअरफोनवर बोलणे, गाणी ऐकणे गुन्हाच आहे. त्याविरुद्ध कारवाई होतेच. आता सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवून आहेत, कुणीही सुटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आम्ही समुपदेशन करतोय, असे सांगलीच्या वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल निकम यांनी सांगितले.

कानाची ऐकण्याची निर्धोक क्षमता ७० डेसिबल इतकी असते, इअरफोनची क्षमता ८० ते १२० डेसीबल इतकी असते. त्यामुळे ते आपल्या कानांना घातक आहे. तरुणाई मोठ्या आवाजातील गाणी ऐकते. त्याचा प्रामुख्याने मज्जातंतूवर परिणाम होऊ शकतो. कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. वारंवार कानात इअरफोन घालू नका, गाडी चालवताना तर नकोच, असा सल्ला नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. अशोक पुरोहित देतात.

इअरफोन घालून गाणी ऐकत गाडी चालवणे खुळचटपणा आहे. तरुणाईतील हे खूळ पालकांनीच दक्ष राहून थांबवले पाहिजे.
-डॉ. चारुदत्त कुलकर्णी,

मानसतज्ज्ञ, सांगली

Web Title: Sangli News Earphone hearing with driving special story