वीज कर्मचाऱ्यांचा 48 तासांच्या संपाचा इशारा

संतोष भिसे
गुरुवार, 8 मार्च 2018

मिरज -  वीज कंपनीच्या खासगीकरणासह विविध धोरणांना विरोध म्हणून कर्मचाऱ्यांनी 26 व 27 मार्चला 48 तासांच्या राज्यव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे. वीज कर्मचारी व अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने काल ( ता. 7 ) मुंबईत उर्जामंत्री आणि वीज कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना तसे पत्र दिले. 

मिरज -  वीज कंपनीच्या खासगीकरणासह विविध धोरणांना विरोध म्हणून कर्मचाऱ्यांनी 26 व 27 मार्चला 48 तासांच्या राज्यव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे. वीज कर्मचारी व अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने काल ( ता. 7 ) मुंबईत उर्जामंत्री आणि वीज कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना तसे पत्र दिले. 

संघटनेच्या प्रमुख मागण्या....

  • वीजवितरणातील कंत्राट पद्धती बंद करावी
  • महानिर्मिती व महापारेषणमधील खासगीकरण थांबवावे
  • पेन्शन योजना लागू करावी 

कर्मचारी व अभियंत्यांच्या मागण्यांबाबत वारंवार चर्चा करुनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही; त्यामुळे राज्यभरातील 85 हजार कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांत असंतोष आहे. महावितरणने तोटा कमी करण्यासाठी काही विभागांच्या खासगीकरणाची कार्यवाही सुरु केली आहे. कर्मचारी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. यापुर्वी जळगाव, औरंगाबाद, नागपूर व मुळा-प्रवरा येथे खासगीकरणाचा यापुर्वीचा प्रयत्न फसला आहे. हजारो कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. हा वाईट अनुभव गाठीशी असताना पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती सुरु आहे.

सात विभागांतील वीजवितरण यंत्रणा खासगी कंपनीकडे देण्यासाठी महावितरणने निविदा मागवल्या आहेत. जनतेच्या मालकीचा उद्योग भांडवलदारी कंपन्यांच्या घशात देण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप संयुक्त कृती समितीने केला आहे. वीजेचे उत्पादन महामंडळाने करायचे आणि वितरण खासगी कंपन्यांनी करायचे असे खासगीकरणामागे नियोजन आहे. 
महावितरण कंपनीने कामगार संघटनांशी चर्चा करुन अंतर्गत सुधारणांचा कार्यक्रम हाती घ्यावा. वितरण हानी व वीजचोरीचे विभाग नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी कृती समितीने केली आहे. ठेका दिला तर औद्योगिक शांततेवर प्रतिकुल परिणाम होईल असा इशारा दिला आहे. 

खासगीकरणाच्या माध्यमातून सौरउर्जा प्रकल्प, अतिउच्चदाब वाहिन्यांची उभारणी अशी कामे महावितरण व महापारेषणमध्ये सुरु आहेत. या खासगीकरणाला संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. गेल्या 12 फेब्रुवारीरोजी राज्यभरात निदर्शने करण्यात आली. इलेक्‍ट्रीक वर्कर्स असोसिएशन, वीज कामगार महासंघ, सबऑर्डीनेट इंजिनीअर्स असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज तांत्रिक कामगार संघटना आणि वीज कामगार काँग्रेसचे सभासद आंदोलनात सहभागी झाले होते. पुढील टप्पा म्हणून 26 आणि 27 मार्चला 48 तासांच्या संपाचा निर्णय घेण्यात आला आहे; याकडेही दुर्लक्ष केले तर हाच संप बेमुदत म्हणून जाहीर केला जाईल. 

कामगारांना सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन योजना सुरु करावी असे निर्देश शासनाने दिले आहेत; त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. 26 फेब्रुवारीरोजी पुण्यात संयुक्त कृती समितीच्या बैठकीत याविषयी जोरदार चर्चा झाली. 

Web Title: Sangli News Electricity Employees on stick