अभियंत्यांनी शहरांतील समस्यांची उत्तरे शोधावीत - अजित गुलाबचंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

सांगली - गेल्या साठ वर्षांत शहरांच्या वाढ आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे वाढते लोंढे शहरांपुढच्या समस्या अधिक बिकट होत असून त्याची उत्तरे नव्या अभियंत्यांना शोधावी लागतील, असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले. स्वायत्त वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

सांगली - गेल्या साठ वर्षांत शहरांच्या वाढ आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे वाढते लोंढे शहरांपुढच्या समस्या अधिक बिकट होत असून त्याची उत्तरे नव्या अभियंत्यांना शोधावी लागतील, असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले. स्वायत्त वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे प्रमुख पाहुणे होते. यावेळी खासदार संजय पाटील, संचालक जी. व्ही. पारिषवाड व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बीटेकच्या ४३२ विद्यार्थ्यांना तर एमटेकच्या २१७ विद्यार्थ्यांना पदवी  प्रदान करण्यात आली.

श्री. गुलाबचंद म्हणाले, ‘‘खेड्यांबद्दलच्या रोमॅन्टिसिझममध्ये खूप मोठा कालखंड लोटला. त्याचवेळी शहरे मात्र झपाट्याने विस्तारत होती. आजच्याइतके जग कधीही पूर्वी समृद्ध नव्हते आणि अस्थिरही.

इसिससारख्या संघटनांचे आव्हान आज  जगाला हादरवून सोडते आहे. पुढच्या दशकभरात तीन मिलियन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि कित्येक पारपंरिक रोजगाराचे स्रोतच संपतील. ही आव्हानेच पुढच्या संधी असतील. बदलणारी बिझनेस मॉडेल पारंपरिक रोजगाराच्या संधी गायब करतील. ग्राहकाला टॅक्‍सी मिळवून देणारी ‘उबर’सारखे बिझनेस मॉडेल असो की येऊ घातलेल्या चालकविरहित कार ही त्याची उदाहरणे आहेत. यात नव्या अभियंत्यांना रोजगाराच्या संधी शोधाव्या लागतील. हा तंत्रज्ञानासह पुढची शहरे अनेक नव्या समस्यांना सोबत घेऊन  वाटचाल करतील. त्यांची सोडवून करणे अभियंत्यासमोरचे आव्हान असेल. एक अभियंता म्हणून तुम्हाला अनेक गुण कौशल्ये आत्मसात करावी  लागतील. मात्र या सर्वांच्या केंद्रस्थानी विश्‍वास हे मूल्य खूप महत्त्वाचे असेल. ज्यावर तुमचे जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील यश अवलंबून आहे.’’

कुलगुरू शिंदे म्हणाले,‘‘जग ज्ञान आणि संधींनी भरले आहे. त्यातल्या शक्‍यता शोधण्याची समज म्हणजे  शिक्षण आहे. देशाला सक्षम अभियंते हवेत. सक्षम डॉक्‍टर्स आणि संशोधक हवेत. देशातील प्रतिष्ठित अशा वालचंद महाविद्यालयामधून तुम्हा मुलांना  शिक्षणाची संधी मिळाली. देशासाठी योगदान देण्यासाठी पुढे या.’’

खासदार पाटील म्हणाले,‘‘महाविद्यालयाचा लौकिक वाढवणारी कामगिरी विद्यार्थी करीत आहेत. तो सतत वाढत रहावा यासाठी एमटीईचे अध्यक्ष म्हणून माझ्यावर आलेली जबाबदारी पार पाडू.’’

विविध विद्याशाखांमधील सुवर्ण, रौप्य आणि कास्यपदक विजेते अनुक्रमे असे ः माहिती तंत्रज्ञान- शीतल गायकवाड, पूजा महंत, स्नेहल नाले, स्थापत्य- आयेशा तांबोळी, चिरंजीव गांगर, सायली जोशी, मेकॅनिकल- आकाश कापसे, अक्षय जवळे, अभिनंदन कुंभार, इलेक्‍ट्रीकल-प्रिया नेजी, अनिशा घाडगे, अनुजा चंद्रकांत तारे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स-शिवराज जाधव, अश्‍विनी माळी, प्रांजली परांजपे, कंप्युटर सायन्स आणि अभियांत्रिकी-अशोक पात्रुडकर, अजिंक्‍य पाठक, शंतनु कामत, एमटेक प्रोग्रॅम- जयश्री यादव (इलेक्‍ट्रीकल कंट्रोल सिस्टीम), प्राची शिरीषकर, वसुधा चेंडके (स्थापत्य), सर्वोत्कृष्ट विद्यार्थी-प्रांजली विनय परांजपे (इलेक्‍ट्रॉनिक्‍स), उत्कृष्ट क्रीडापटू स्वरूप वायकोळे (सिव्हिल), सर्वोत्कृष्ट अकॅडमीक कामगिरीबद्दल  शिवराज जाधव (इलेक्‍ट्रॉनिक्‍स) यांचा श्री. गुलाबचंद यांच्या हस्ते सत्कार झाला.

Web Title: sangli news Engineers seek answers to problems in the city