बनावट कीटकनाशकाच्या विक्री प्रकरणी ६८ कृषी केंद्रांचे निलंबन होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सांगली - चिकुर्डे (ता. वाळवा) येथे बनवलेल्या बनावट कीटकनाशकाच्या विक्री प्रकरणी जिल्ह्यातील ६८ कृषी सेवा केंद्रांवर परवाना निलंबनाची टांगती तलवार आहे. या चौकशीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे असून ते कारवाई करणार आहेत.

सांगली - चिकुर्डे (ता. वाळवा) येथे बनवलेल्या बनावट कीटकनाशकाच्या विक्री प्रकरणी जिल्ह्यातील ६८ कृषी सेवा केंद्रांवर परवाना निलंबनाची टांगती तलवार आहे. या चौकशीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे असून ते कारवाई करणार आहेत. या उत्पादकाने गेल्या काही महिन्यात बनावट कीटकनाशकाच्या तब्बल ८२ हजार पुड्या विकल्या होत्या. त्यामुळे उत्पादकाला मोठा दणका बसणार हे स्पष्ट आहे, खात्री न करता औषध विकणाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष असणार आहे. 

चिकुर्डे येथील ओंकार कृषी सेवा केंद्राचे चालक बाबूराव तुकाराम परीट यांनी हा बनावट कीटकनाशकांचा  कारखाना खोलला होता. त्यांचा मुलगा संजय हा हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीत नोकरीला होता. या कंपनीचा विक्री प्रतिनिधी दुर्गासिंग राजपूत हाही संजयच्या संपर्कात होता. त्यांनी संगनमताने याच कंपनीच्या नावे बनावट कीटकनाशकांची निर्मिती केली.

परीट कंपनीचे वितरक असल्याने त्याविषयी सुरवातीला शंका आली नाही, मात्र कंपनीला संशयास्पद गोष्टी आढळल्याने तक्रार करून चौकशी सुरू करण्यात आली. त्यात परीट यांच्याकडून १ लाख २ हजार पुड्या कीटकनाशक विकल्याचे समोर आले. त्यातून केवळ २० हजार पुड्या कंपनीकडून खरेदी केलेल्या होत्या, बाकी ८२ हजार पुड्या बनावट होत्या. त्याबाबत कुरळप पोलिसांत फिर्याद असून त्याची चौकशी सुरू आहे. 

या प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर या पुड्या सांगली,  कोल्हापूर, पुणे, नगर आदी जिल्ह्यांत विकल्याचे स्पष्ट झाले. त्यात सांगली जिल्ह्यातील ६८ कृषी सेवा केंद्रांची नावे पुढे आली आहेत. त्यातील काहींकडे उपलब्ध पुड्यातील नमुने तपासले असता या कीटकनाशकात केवळ ९ टक्के इतके स्ट्रेप्टोसायल्कीन हायड्रोक्‍लोराईड वापरल्याचे स्पष्ट झाले. त्याचे प्रमाण ९० टक्के असावे लागते.

दरम्यान, या कृषी केंद्रांनी बनावट पुड्यांचे वेष्टन तंतोतंत असल्याने आमची फसगत झाली, शिवाय  बनावट उत्पादक हा वितरक असल्याने संशय आला  नाही, असा खुलासा केला आहे. त्यामुळे या केंद्रांवर  काय कारवाई होते, याकडे लक्ष आहे. परवाना निलंबन होईल, मात्र ते किती दिवसांसाठी, हे महत्त्वाचे असणार आहे.

Web Title: Sangli News fake pesticide sale issue