पावसाच्या हुलकावणीने शेतकरी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

आता नजरा आकाशाकडे; खरिपाच्या केवळ २० टक्के पेरण्या 
सांगली - यंदा पावसाचा चांगला अंदाज होता. शेतकऱ्यांनी खरिपाच्या आगाप पेरण्या केल्या; मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सध्या खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. शिराळ्यात भाताच्या धूळवाफेवर पेरण्या झाल्या तरी पावसाअभावी वाढ खुंटली आहे. नदीकाठावर सोयाबीन आणि भुईमुगाची टोकणी सुरू आहे. दुष्काळी जत, आटपाडी तालुक्‍यांत ज्वारी, बाजरीचे मोठे क्षेत्र आहे, तेथे अपवादात्मक पेरण्या झाल्या. 

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ३ लाख ४७ हजार ४४२ हेक्‍टर आहे. खरीपपूर्व मशागतींची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यासाठी साडेसात हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. खताची आतापर्यंत बारा हजार टन विक्री झाली आहे. जूनच्या पंधरवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला, त्यानंतर जोर कायम राहण्याची अपेक्षा होती. पावसानंतर पश्‍चिम भागात पेरणीला सुरवात झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार हेक्‍टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. शिराळा तालुक्‍यात जूनच्या सुरवातीस धूळवाफेवर भाताची लावण झाली. शिराळ्यात बावीस हजार हेक्‍टर भाताचे क्षेत्र  असून त्यापैकी १७ हजार सहाशे हेक्‍टरवर लावण झाली. कृष्णा, वारणा नदीकाठावर सोयाबीन आणि भुईमुगाच्या टोकणीला गती आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा आणि मिरज पश्‍चिम भागात दोन्ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सोयाबीनचे ५८ हजार ७६० हेक्‍टर क्षेत्र असून ४ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. भुईमुगाचे २६ हजार हेक्‍टरपैकी ३ हजार हेक्‍टरवर टोकण झाली आहे. 

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर या तालुक्‍यांत ज्वारी आणि बाजरीचे मोठे क्षेत्र आहे. तेथील शेतकरी पावसावर अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. ज्वारीचे ६३ हजार ४६० हेक्‍टर क्षेत्र असून अद्याप एक हजार हेक्‍टरवरही पेरणी झालेली नाही. बाजरीचे ४३ हजार ४२० हेक्‍टर क्षेत्र असून पेरणी झालेली नाही. 

मक्‍याचे तीन हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी १ हजार हेक्‍टर, मूग ६ हजार नऊशे हेक्‍टरपैकी पाचशे, उडीद ७ हजार सातशे हेक्‍टरपैकी १ हजार, इतर कडधान्ये १ हजार हेक्‍टवर पेरणी झाली. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात गेल्यावर्षी याचवेळी २५ टक्के पेरण्या झाल्या होत्या. पण, यावर्षी मात्र ती सरासरीही गाठू  शकलेली नाही.

Web Title: sangli news farmer Farmers worried due to rains in the rainy season