संपकरी शेतकऱ्यांचा उद्रेक : कृष्णा-वारणाकाठ भडकला; शेतकऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

"शेतकऱ्यांच्या संपाची सकाळपासून मी माहिती घेतोय. भाजीपाला आवक सुमारे 30 टक्‍क्‍यांपर्यंत घटली आहे. आंदोलकांनी कायदा हातात घेवू नये, असे मी आवाहन करतो. पोलिस यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.'' 
- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी सांगली

सांगली : इतिहासात पहिल्यांदाच संप करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज पहिल्याच दिवशी उद्रेक झाला. तब्बल चार टॅंकर दूध रस्त्यावर ओतून बळीराजाने सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. कृष्णा, वारणाकाठाहून मुंबई आणि हैदराबादला जाणारा भाजीपाला रोखून धरत सरकारची कोंडी करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. भाजीपाल्याचा तोडा थांबवणे, वाहनांची अडवणे आणि टॅंकर फोडणे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आंदोलनाची धार दिवसभर वाढवत नेली. त्यात मिरज-म्हैसाळ रस्त्यावर दुधाचा टॅंकर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. जिल्हाभर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ करून शेतकऱ्यांनी कायदा हातात घेवू नये, यासाठी प्रयत्न केले. 

"शेतकऱ्यांचा संप' या अद्‌भूत वाटणाऱ्या गोष्टीचं नेमकं काय होणार, याविषयी राज्यासह जिल्ह्यात उत्सुकता होती. या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला एक गाडी फोडून शेतकऱ्यांनी इरादे स्पष्ट केले होते. आजची सकाळ शिवारात आंदोलनाचं पीक घेवूनच उगवली. दूध संकलन होणार का नाही, भाजीपाला मिळणार का नाही, अशा प्रश्‍नांसह राज्यभरात भडका उडाल्याच्या बातम्या येवून धडकल्या. त्यापाठोपाठ जिल्ह्यातही आंदोलनाचा भडका उडाला. मिरज, वाळवा, कडेगाव, पलूस, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. युवा शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकरी संपाला दाद न देणाऱ्या दूध संकलन केंद्रांच्या गाड्यांवर हल्ला चढवला. टॅंकर अडवा आणि दूध ओता, असा कार्यक्रम ठिकठिकाणी राबवला गेला. तब्बर चार मोठे टॅंकर रस्त्यावर मोकळे करण्यात आले, शिवाय कॅनमधून नेले जाणारे दूधही रस्त्यावर ओतून टाकण्यात आले. 
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे संतप्त शेतकऱ्यांनी दूध संकलन करणारी दूधाची गाडी अडवून दूध रस्त्यावर ओतले. त्याचे फोटो सोशल मिडियावर पडले आणि त्यापाठोपाठ अन्यत्र दूध ओतण्याचे आंदोलन सुरु झाले. जिल्ह्यात संपाची ठिणगी पेटत गेली. शेतकऱ्यांसह नागरिकही आक्रमक झाले. दुष्काळी भागातील शेतकरी आक्रमक होऊन वाहनांच्या टायर पंक्‍चर केले. सांगली बाजार समितीच्या विष्णूअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये शेतीमालात घट झाली. भाजीपाल्याची आवक 30 टक्के तर काद्यांची आवक 40 टक्‍क्‍यांनी घटली. शहरातील भाजीपाला दरात मोठी वाढ झाली. 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, उत्पादन खर्चावर आधारीत दर द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्या यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपास जिल्हाभर चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक गावातील दुध विक्री आणि संस्था बंद ठेवुन गुरुवारी शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे पाठिंबा दिला. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला आणि शिवाजी मंडईतील भाजीपाला आणि फळांची सुमारे 50 टक्कांनी आवक घटली. भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. संपाची तीव्रता शुक्रवारी (ता.2) पासून वाढणार असल्याने दूध, भाजीपाला यांचा तुटवडा होण्याची शक्‍यता आहे. 

कर्नाटकच्या गाड्या अडवल्या 
जिल्ह्यात सकाळपासूनच कर्नाटक राज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्या शेतकरी संघटनेने अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी संघटनेच्या 10 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळे या दुय्यम आवारात या मालाची आवक व्हायची. त्यावर परिणाम झाली. बुधवारी (ता. 31) मध्यरात्रीपासूनच बटाट्याचीसह अन्य फळांची आवक मंदावली आहे. बाजार समितीत काही प्रमाणात व्यवहार बंद आहेत. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून रत्यावर उतरुन सरकारचा निषेध केला. 

उमदी (ता. जत) या गावातील शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात येणारा शेतीमाल अडवला. दूध संकलनाच्या गाड्याच ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी येवू दिल्या नाहीत. त्यामुळे दूध संकलनावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सांगली शहरात भाजीपाल्याच्या आवकेत 30 तर काद्यांची आवक 40 टक्‍क्‍यांनी घटली आहे. भाजीपाल्याचे दरात मोठी वाढ झाली आहे. उद्यापासून ( ता. 2) आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार आहे. दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण होणार आहे. काही गावात आठवडा बाजार बंद ठेवले. दुध-भाजीपाल्याची वाहने अडवणाऱ्या कार्यकर्त्याची धरपकड करण्यात आली. 

शेतकरी संप अपडेट... 

 • * दुधाचे दोन देवराष्ट्रे, रांजणीत टॅंकर ओतले 
 • * मिरज-पंढरपूर रस्त्यावर दूध ओतून निषेध 
 • * टॅंकर फोडताना मिरज म्हैसाळ रस्त्यावर दहा शेतकऱ्यांना अटक 
 • * भाजीपाल्याचा शेवटचा तोडा रात्रीत मुंबई, हैद्राबादला 
 • * आजपासून नवा तोडा पूर्णपणे बंद 
 • * दूध संकलन झाले, वाहतूक थांबली 
 • * सांगली शहरात भाजीपाला आवक 30 टक्‍क्‍यांनी घटली 
 • * विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये कांदा आवक 40 टक्‍क्‍यांवर 
 • * शेतकऱ्यांचा गावागांवत एकत्र येवून सक्रिय सहभाग 
 • * पुणे-बंगळुरू महामार्गासह जिल्हाभर पोलिसांचा बंदोबस्त 
 • * येळावीत बंद 
 • * मिरज-पंढरपूर रस्त्यावर शेळ्या-मेढ्यांची वाहतूक रोखली 

सदाभाऊंची चर्चा 
काही महिन्यापूर्वीपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी सरकार आणि व्यवस्थेवर तुटून पडणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज वेगळ्या रोलमध्ये दिसले. त्यांची प्रतिक्रिया दिवसभर टीव्हीवर झळकत होती. त्यात ते आक्रमक आंदोलन करणे, उद्रेक करणे, कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे सांगत होते. सरकारशी चर्चा करा, असे आवाहन करत होते. सदाभाऊंच्या या भूमिकेची दिवसभर शेतकऱ्यांत चर्चा होती. 
 

Web Title: sangli news farmers strike violence farmers arrested