पाच पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त

बलराज पवार
सोमवार, 21 मे 2018

सांगली - शहरातील शंभर फुटी रस्त्यावर गुंडाविरोधी पथकाने  दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली. सौरभ विजय कुलकर्णी (वय २१) आणि सौरभ सुनील जाधव (२२, दोघेही रा. गुरसाळे, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सांगली - शहरातील शंभर फुटी रस्त्यावर गुंडाविरोधी पथकाने  दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली. सौरभ विजय कुलकर्णी (वय २१) आणि सौरभ सुनील जाधव (२२, दोघेही रा. गुरसाळे, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या कारवाईमुळे हे पिस्टल कुणासाठी आणले होते, कुठून आणले, त्यांच्या मागे कोण आहेत याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार बैठकीत दिली.

गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना खबऱ्याकडून दोन तरुण पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. त्यावरून त्यांनी आज सकाळपासूनच शंभर फुटी रोडवर गुंडाविरोधी पथकाचा सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार एका मोटारसायकलवरून दोन तरुण चेतना पेट्रोल पंपाजवळ आले असता त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच बिगरपरवाना पिस्टल, दहा जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी या शस्त्रांसह त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण तीन लाख ३७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या वेळी अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक डोके, लक्ष्मण मोरे, महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रूपनर, सचिन कुंभार, सागर लवटे, संदीप गुरव, वैभव पाटील, संतोष कानडे, आर्यन देशिंगकर, संतोष गळवे, मोतीराम खोत, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे यांनी कारवाई केली.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही शस्त्रे कुणी मागवली, याचा शोध घेण्यात येत आहे. कुणी समाजकंटक आहेत का, याचा तपास करण्यात येईल. ही शस्त्रे मागवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न मोडून काढला जाईल. 
- सुहेल शर्मा,
पोलिस अधीक्षक
 

Web Title: Sangli News five Pistol seized in Sangli