मिरजेत महिलेला ४२ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

मिरज - येथील कुपवाड रस्त्यावरील गव्हर्न्मेंट कॉलनी परिसरात राहणाऱ्या सविता अरुण सूर्यवंशी (वय ७१) या महिलेची तब्बल ४२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात दाखल झाली.

मिरज - येथील कुपवाड रस्त्यावरील गव्हर्न्मेंट कॉलनी परिसरात राहणाऱ्या सविता अरुण सूर्यवंशी (वय ७१) या महिलेची तब्बल ४२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्यांना फसवणारीही महिलाच आहे. प्रीती सिंह असे तिचे नाव आहे. पतीच्या विम्याचे पैसे मिळवून देतो, असे सांगून सिंह हिने फसवणूक केल्याचे सूर्यवंशी यांनी तक्रारीत म्हटले आहे. 
हा फसवणुकीचा प्रकार वर्षभरापासून सुरू आहे. सूर्यवंशी अमेरिकेहून नोकरीतून निवृत्ती घेऊन मिरजेस आल्या आहेत.

वर्षभरापूर्वी त्यांना दिल्लीहून प्रीती सिंह हिचा दूरध्वनी आला. सूर्यवंशी यांना त्यांच्या पतीच्या नावे आपल्या कंपनीकडे असलेल्या तीन विम्यांची रक्कम पडून असल्याचे सांगून ती काढून घ्या. अन्यथा सरकारजमा होईल, अशी बतावणी तीने केली. सिंह हिने सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधून ओळख वाढवली. ८६ लाखांची रक्कम खूप असल्याने नातेवाईकांशी चर्चा करू नका, असा सल्ला प्रीतीसिंहने त्यांना दिला. रक्कम काढून देण्यासाठी काही पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. 

सूर्यवंशी यांनी सिंह हिच्यावर विश्‍वास ठेवून ऑनलाईन पैसे देण्यास सुरवात केली. पाच हजारपासून ते पंचवीस हजारपर्यंत रक्कम मागून प्रीती सिंहने सूर्यवंशींकडून तब्बल ४२ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन उकळले. मे २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत ही फसवणूक झाली. पैसे संपल्यानंतरही प्रीतीसिंहची मागणी वाढतच राहिली. आतापर्यंत दिलेले व मिळणारे असे पैसे बुडू नयेत म्हणून सूर्यवंशी यांनी नातेवाईकांकडे काही पैसे मागितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

ठकसेन मंडळी अशा ठेवीदारांची फसवणूक करण्यासाठी अशा प्रकारचे फंडे वापरतात. फोनवरून माहिती देऊ नये. असा कॉल आल्यास त्वरित नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा.  
- प्रवीणकुमार कांबळे,
सहायक पोलिस निरीक्षक, मिरज

Web Title: Sangli News fraud incidence in Miraj