भटक्या-विमुक्तांकडून प्रांतधिकाऱ्यांना खर्डा-भाकरी भेट; बॅंकिंग धोरणाविरूद्ध आंदोलन

संतोष भिसे
सोमवार, 28 मे 2018

मिरज - मुद्रा योजनेतून कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बॅंका टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ भटक्‍या व विमुक्तांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना खर्डा-भाकरी भेट दिली. आंदोलनाच्यानिमित्ताने कडकलक्ष्मी, वाघ्या-मुरळी, गोंधळी, वासुदेव, पोतराज, वासुदेव, बहुरुपी इत्यादी भटका समाज रस्त्यावर आला होता. 

मिरज - मुद्रा योजनेतून कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बॅंका टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ भटक्‍या व विमुक्तांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना खर्डा-भाकरी भेट दिली. आंदोलनाच्यानिमित्ताने कडकलक्ष्मी, वाघ्या-मुरळी, गोंधळी, वासुदेव, पोतराज, वासुदेव, बहुरुपी इत्यादी भटका समाज रस्त्यावर आला होता. 

या जाती-जमातीतील लोकांना राष्ट्रीयकृत बॅंकांकडून मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज नाकारले जात आहे. याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राहूल मोरे, महेश भोसले, संजय भोसले, राजू भोसले, राकेश कोळेकर, योगेश भोसले, शाहीन शेख, रामा माने, चंद्रकांत मोरे, आदींनी नेतृत्व केले.

बहुरुपी, वासुदेव, कडकलक्ष्मी, पोतराज, गोंधळी, गाडीवडर असे नाना जाती-जमातीचे लोक सहभागी झाले होते. कडकलक्ष्मीचा देव्हारा डोक्‍यावर घेतलेल्या महिलांनी शासनाच्या नावे जागर मांडला. गाडीवडर जमातीचे आंदोलक गाढवे घेऊन सहभागी झाले. वासुदेवांनी टाळ-चिपळ्यांसह गजर सुरु ठेवला होता.

गोंधळ्यांचे संबळ - तुणतुणे अग्रभागी अखंड वाजत होते. समोर मोकळ्या जागेत पोतराजांचे आसूड कडाडत होते. भंडारा आणि कुंकू कपाळी माखलेले उघडे पोतराज घुमताना शासनाला आवाहन करत होते. बॅंकांच्या धोरणाचा निषेध करत होते. कडक इस्त्रीचा गणवेष घातलेला बहुरुपी "पोलिस इन्स्पेक्‍टर"ही न्यायासाठी आला होता. एरवी गावकुसाबाहेरच राहणारा हा समाज अचानक रस्त्यावर आल्याचे पाहून शहरवासीय थबकले. 
लक्ष्मी मार्केटसमोर गांधी उद्यानात आंदोलकांनी खर्डा-भाकरीची न्याहरी केली. त्यानंतर प्रांत कार्यालयाकडे कुच केली. प्रांताधिकाऱ्यांना खर्डा-भाकरीची भेट दिली; सोबत मागण्यांचे निवेदन सादर केले. 

आंदोलनाचे नेते राहूल मोरे, महेश भोसले, संजय भोसले म्हणाले, पिढ्यान्‌पिढ्या भटकत राहीलेला हा समजा आता कोठे स्थिरावू पाहतोय. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन घरकुले, व्यवसाय मिळवू पाहतोय. पण नोकरशाहीची धोरणे आणि मानसिकता आडवी येतेय. मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी विनातारण-विनाजामिन कर्ज देण्याचे प्रधानमंत्र्यांचे आदेश आहेत; पण राष्ट्रीयकृत बॅंका आम्हाला जवळ करेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे खर्डा-भाकर खाण्याची वेळ आली आहे. आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर तीव्रता वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात बाबु कडकलक्ष्मी, हिराबाई कोळी, सुरेश कलगुटगी, समर कागवाडे हे देखील सहभागी झाले.

आंदोलनाच्या आडोशाला राजकीय नेतेदेखील !
महापालिका निवडणुकीचे रणांगण तापत असल्याने राजकीय नेतेही आंदोलनात सामिल झाले. शहर- जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, किशोर जामदार, विशाल कलगुटगी, महंमद मणेर, सचिन जाधव, बसवेश्‍वर सातपुते, रुक्‍मिणी अंबीगेर आदींनी हजेरी लावली

Web Title: Sangli News Front against banking policies