द्राक्षबागांमध्ये ५० टक्के फळकूज

अभिजित डाके
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सांगली -  परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांना चांगलाच फटका बसला. द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. डाऊनी कमी होत असतानाच सततच्या पावसाने द्राक्ष घडांमध्ये पाणी साचून राहिल्याने सुमारे ५० टक्‍क्‍यांहून अधिक फळकूज झाली. यामुळे उत्पादनात सुमारे ३० टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

सांगली -  परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांना चांगलाच फटका बसला. द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. डाऊनी कमी होत असतानाच सततच्या पावसाने द्राक्ष घडांमध्ये पाणी साचून राहिल्याने सुमारे ५० टक्‍क्‍यांहून अधिक फळकूज झाली. यामुळे उत्पादनात सुमारे ३० टक्के घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

सांगली जिल्ह्यात सुमारे १ लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. सुमारे पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आगाप फळ छाटणी घेतली आहे. त्यातच पोंगा अवस्थेत असताना द्राक्षबागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी फवारणी केल्याने डाऊनीचा प्रादुर्भाव काहीशा प्रमाणात कमी झाला असतानाच पंधरा दिवस झालेल्या पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या कष्टावर पाणी फिरले. द्राक्ष मण्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने फळकूज होण्यास प्रारंभ झाला. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. 

अस्मानी संकट आल्याने द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. आजअखेर प्रत्येक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केल्याने आर्थिक चणचण भासू लागली. आता आर्थिक तरतूद कशी करायच, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली नाही. यामुळे बॅंका कर्ज देणार का, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे खासगी सावकारांकडून कर्ज घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 

उत्पादनात घटीची शक्‍यता 
जिल्ह्यात एक लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ५० ते ६० टक्‍क्‍यांहून अधिक म्हणजे ५० हजार ते ६० हजार क्षेत्रामध्ये आगाप फळ छाटण्या झाल्या आहेत. त्यातील सुमारे ५० टक्के क्षेत्रात डाऊणी, फळगळ आणि फळकूज याचा फटका बसला आहे. यामुळे या क्षेत्रातील द्राक्षाचे उत्पादन ३० टक्के घटण्याची शक्‍यता आहे. परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आजपर्यंत घातलेला खर्च मिळणे अवघड होणार आहे.

खानापूर घाटमाथ्यावर रिमझिम पावसामुळे फळगळ आणि फळकूज मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिवसेंदिवस खर्चात वाढ होत आहे. दिवाळीही बागेतच साजरी करावी लागली. 
- अरविंद पाटील, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, पळशी, जि. सांगली. 

द्राक्षबागेत पाणी साचल्याने आताचे पीक येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुढील वर्षी पीक घेण्यासाठी बाग जगविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यासाठी खर्च करावाच लागणार आहे. 
- किरण भोसले, द्राक्ष उत्पादक, मळणगाव, जि. सांगली.

Web Title: Sangli News Fruitcush in Grape crop