प्रामाणिक ‘रेशनिंग’साठी पगार द्या - गजानन बाबर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सांगली - स्वस्त धान्य दुकानदारांनी आतापर्यंत हातचलाखी केली, मात्र अधिकारीदेखील त्यात वाटेकरी होते. आम्ही प्रामाणिकपणे रेशनिंग व्यवसाय केल्यास उपाशी मरावे लागेल, अशी सरकारनेच व्यवस्था निर्माण केली आहे. प्रामाणिकपणे व्यवसायाला आम्ही नेहमीच तयार आहोत, मात्र त्याआधी सरकारने पगार सुरू करावा, अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर फेडरेशनचे नेते माजी खासदार गजानन बाबर यांनी आज येथे दिला.

सांगली - स्वस्त धान्य दुकानदारांनी आतापर्यंत हातचलाखी केली, मात्र अधिकारीदेखील त्यात वाटेकरी होते. आम्ही प्रामाणिकपणे रेशनिंग व्यवसाय केल्यास उपाशी मरावे लागेल, अशी सरकारनेच व्यवस्था निर्माण केली आहे. प्रामाणिकपणे व्यवसायाला आम्ही नेहमीच तयार आहोत, मात्र त्याआधी सरकारने पगार सुरू करावा, अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर फेडरेशनचे नेते माजी खासदार गजानन बाबर यांनी आज येथे दिला.

येथील वसंतदादा मार्केट यार्डमधील वसंतदादा हॉलमध्ये मेळावा झाला. जिल्हाधिकारी कार्यायावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १ सप्टेंबरपर्यंत पगाराविषयी निर्णय झाला नाही तर पॉस मशीन पुरवठा विभागात जमा करू, असा इशारा दिला. राज्याचे  उपाध्यक्ष वसंत अग्रवाल, सचिव बाबूराव म्हमाणे, जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी व्यासपीठावर होते. 

बाबर यांनी जाहीर व्यासपीठावर  रेशनिंगची कुंडली मांडली. ते म्हणाले,‘‘रेशनिंग प्रश्‍नावर सरकार  सहजासहजी नमणार नाही, मात्र त्यांनी रेशनिंगवाल्यांशी पंगा घेऊ नये. गावपातळीवरील नस माहिती असलेल्यांच्या नादाला लागाल तर बाद व्हाल. आम्ही  चोर असू, मात्र सरकार डाकू आहे. आम्ही पोटासाठी खटाटोप करतो, अधिकारी वाटेकरी आहेत. काँग्रेसने २ रुपये किलो गहू, ३ रुपये किलो तांदूळ दिला. आपल्या हुशार मंडळींच्या ‘ब्लॅक’ला पेव फुटले. गहू १५ ने तर तांदूळ २० ने विकला. अंबानीपेक्षा जास्त नफा  मिळवला. आता परिस्थिती उलटली आहे. पॉझ  मशीनमुळे अंगठा दाखवा, धान्य न्या व्यवस्था आली आहे. आता पळवाटा नाहीत, आता किती पोती धान्य विकणार अन्‌ १५० रुपयांनी किती मिळणार? उपासमारीची वेळ येईल, दुकाने बंद करावी लागतील. जो प्रामाणिक तोच टिकेल.’’

ते म्हणाले,‘‘प्रामाणिकपणे व्यवसायास आम्ही तयार आहोत, मात्र जगण्यापुरती व्यवस्था करा. महिन्याला शहरात ५० हजार, ग्रामीण भागात ४० हजार रुपये पगार द्या. अन्न महामंडळ स्थापन करा. धान्यातील तूट भरून द्या. पॉझ मशीन मराठीत चालवा. दुकान काढून घेण्याचा इशारा देताना एखादे दुकान तहसीलदारांना दुकान चालवायला द्या, म्हणजे आमचे दुखणे कळेल. या मागणीसाठी सरकारशी भांडावे लागेल. त्यासाठी एकत्र रहावे लागेल. आपले वाद बाजूला ठेवावे लागतील.’’

श्री. अग्रवाल म्हणाले,‘‘सरकारकडे एकजुटीने पाठपुरावा केला तरच दखल घेतली जाणार आहे. तमिळनाडू येथे पगार सुरू झाला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात तो दिला पाहिजे.’’ 

मौलवी म्हणाले,‘‘हक्कासाठी जिल्ह्यातील सर्वजण एकजुटीने लढू. ताकद दाखवून देईन. मागे हटलो तर दुकाने बंद पडतील.’’

आप्पासाहेब भोसले, बाळासाहेब कोरे, यशवंत भोरे, शशिकांत मोरे, प्रभाकर कोळपकर, संदीप ठोंबरे, आनंदराव पाटील, आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब  पवार, दीपक उपाध्ये, कुमार कोळी, पांडुरंग जमदाडे आदी उपस्थित होते.

Web Title: sangli news gajanan babar