किर्तीकरांनी भर सभेत घेतला सांगली शिवसेना जिल्हाप्रमुखांचा  समाचार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

ही गर्दी कसली आहे, नुसती गर्दी करून लोकांमध्ये कोण जाणार? बुथ प्रमुख कुठे आहेत? तालुका प्रमुख कुठे आहेत? शिवसेनेची फसवणूक करताय. तुम्ही सरदार म्हणवून घेता, मग सैन्य कुठे आहे? बिन सैन्याची लढाई कशी करणार? ह्यांच्या नेमणूका रद्द करून टाका.

- गजानन किर्तीकर

सांगली - "नुसती गर्दी करून कुणाला फसवताय? कुठे आहेत बूथ प्रमुख, कुठे आहेत तालुकाप्रमुख...शिवसेनेची फसवणूक करताय का? उद्धव ठाकरे जीव तोडून स्वबळाची भाषा करताहेत आणि तुम्ही आम्हाला दुधखेळे समजून फसवताय'', अशा शब्दांत शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क नेते, खासदार गजानन किर्तीकर यांनी आज येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते आणि आनंदराव पवार यांचा भर सभेतच समाचार घेतला. 

येथील विष्णूदास भावे नाट्यमंदीरमध्ये सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी "भगवा फडकणारच' हा पदाधिकारी आणि बुथप्रमुखांचा मेळावा झाला. यावेळी नाट्यमंदीरातील मागच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. याची दखल गजानन किर्तीकर यांनी प्रथम घेतली.

""येथे बुथप्रमुख कोण कोण आहेत, हात वर करा', असे सांगताच केवळ तीन हात वर झाले...किर्तीकरांची तेथेच सटकली. त्यांनी तालुका प्रमुखांना गणतीसाठी हातवर करण्यास सांगितले... अवघे चार हातवर आले... त्यामुळे अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी जिल्हाप्रमुख विभुते आणि पवार यांना समोर बोलावले. व्यासपीठावर दोघांना समोर उभे करून त्यांचा या प्रश्नी समाचार घेतला. ""ह्या दोघांना काढून टाका'', अशा शब्दांत संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील यांना फर्मान सोडले. 

किर्तीकर म्हणाले, ""ही गर्दी कसली आहे, नुसती गर्दी करून लोकांमध्ये कोण जाणार? बुथ प्रमुख कुठे आहेत? तालुका प्रमुख कुठे आहेत? शिवसेनेची फसवणूक करताय. तुम्ही सरदार म्हणवून घेता, मग सैन्य कुठे आहे? बिन सैन्याची लढाई कशी करणार? ह्यांच्या नेमणूका रद्द करून टाका. उद्धव ठाकरे स्वबळावर लढाईची घोषणा करत आहेत. तुम्ही आम्हाला दुधखुळे समजाय का? आम्ही इतकं केकाटून उपयोग काय? मतदार संघात पोहणार कोण?

दगडू सपकाळ तेथे समन्वयक म्हणून ठाण मांडून आहेत, मी संपर्क नेता आहे... इथे बुथप्रमुखच नाहीत. तुम्हाला चार आणि पाच जागा जिंकून समाधान मानायचे असेल तर हे चालणार नाही. तोंडावर मोठ्या लढाया आहेत. पुन्हा पंधरा दिवसांनी मेळावा घ्या. तालुका प्रमुखांना जाब विचारा, असेही श्री किर्तीकर म्हणाले. 

Web Title: Sangli News Gajanan Kirtikar comment