तासगावात ‘ताकद’ ठरविणारी निवडणूक

रवींद्र माने
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

तासगाव - तासगाव तालुक्‍यातील २५ ग्रामपंचायतींचे रणांगण अखेर सुरू झाले असून, पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी आबा-काका गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. एखादा अपवाद वगळता दोन्ही गट आमने-सामने आले असून, बहुतांशी लढती दुरंगी अशाच आहेत. मणेराजुरी, वायफळे, आरवडे, कुमठे, चिंचणी या ठिकाणच्या लढती या वेळी चुरशीच्या ठरणार असून, सर्वांचे लक्ष या लढतींकडे लागले आहे. 

तासगाव - तासगाव तालुक्‍यातील २५ ग्रामपंचायतींचे रणांगण अखेर सुरू झाले असून, पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी आबा-काका गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. एखादा अपवाद वगळता दोन्ही गट आमने-सामने आले असून, बहुतांशी लढती दुरंगी अशाच आहेत. मणेराजुरी, वायफळे, आरवडे, कुमठे, चिंचणी या ठिकाणच्या लढती या वेळी चुरशीच्या ठरणार असून, सर्वांचे लक्ष या लढतींकडे लागले आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींची ही निवडणूक खासदार, आमदार गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे. ‘‘कुणाची ताकद किती?’’ याचे चित्र स्पष्ट होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे अपयश धुऊन काढण्यासाठी खासदारांना संधी मिळाली आहे, तर आपला गड टिकविण्याचे आव्हान आमदारांसमोर असणार आहे.

बरोबर पाच वर्षांपूर्वी आबा-काका समझोता एक्‍स्प्रेस सुसाट धावत असताना या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे आता निवडणूक सुरू असलेल्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र पॅनेलने निवडणुका लढविल्या गेल्या होत्या. त्यामुळे नक्‍की कोणती ग्रामपंचायत कुणाकडे? याचा पत्ताच पाच वर्षे लागत नव्हता. अशा संमिश्र लढविल्या गेलेल्या गावांमध्येही या वेळी दोन्ही गट आमने-सामने आले असल्याने ‘ कुणाची ताकद किती’ याचा कस लागणार आहे. शिवाय एखादा अपवाद वगळता बहुतांशी प्रभागांमध्ये आणि सरपंचपदासाठी एकास एक लढती होत आहेत, यावरून राजकीय संघर्ष किती टोकाचा झाला आहे याचे प्रत्यंतर येते. या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक नक्‍कीच राष्ट्रवादी आणि भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची अशी झाली आहे.

या वेळी प्रथमच सरपंचपद थेट मतदारांमधून निवडले जाणार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पहिला लोकनियुक्‍त सरपंच होण्यासाठी आणि आपल्याच गटाचा सरपंच करण्यासाठी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बहुतांशी ठिकाणी सरपंचपदासाठी दोन्ही गटांतून एकास एक लढत होत असल्याने सरपंचपदासाठीही ‘ताकद’ दाखविण्याची संधी दवडायची नाही, या इर्षेतून राष्ट्रवादी आणि भाजप इर्षेने निवडणुकीत उतरले आहेत. सरपंचपदाच्या इर्षेचे प्रत्यंतर तर सरंपचपदाच्या इच्छुकांच्या निवडींवेळी आले. अनेक गावांमध्ये ‘आर्थिक ताकदी’चा अंदाज घेऊन सरपंचपदाचे उमेदवार दिले गेल्याचे डावपेचही टाकले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाने डावलल्याच्या नाराजीतून काही गावांमध्ये बंडखोऱ्या झाल्या आहेत, त्यांनाही आपली ताकद दाखविण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. 

लक्षवेधी लढती 
चिंचणी, अंजनी, मणेराजुरी, वायफळे, आरवडे आणि कुमठे या गावांमधील लढती या वेळी प्रतिष्ठेच्या आणि लक्षवेधी ठरणार आहेत. त्यातही वायफळे आणि मणेराजुरी वर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. चिंचणी आणि अंजनी येथे या वेळी प्रथमच थेट दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. चिंचणी येथे तर प्रथमच दिनकरआबा घराण्यातच निवडणूक सुरू झाली आहे. कुमठे येथे या वेळी पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दोन्ही गट आमने-सामने आहेत.

Web Title: sangli news Grampanchayat Election