ऐन दिवाळीत कवठेमहांकाळला रंगणार राजकीय धुळवड

गोरख चव्हाण
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

कवठेमहांकाळ -  तालुक्‍यातील २७ ग्रामपंचायतींच्या रणसंग्रामात आजी-माजी सभापती, उपसभापतींच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. एकीकडे थेट सरपंचपदामुळे जोरदार टशन असून, अनेक गावांत दुरंगी व तिरंगी सामने रंगणार आहेत. एकंदरीतच, तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त ऐन दिवाळीत राजकीय धुळवड रंगणार असून, स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

कवठेमहांकाळ -  तालुक्‍यातील २७ ग्रामपंचायतींच्या रणसंग्रामात आजी-माजी सभापती, उपसभापतींच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. एकीकडे थेट सरपंचपदामुळे जोरदार टशन असून, अनेक गावांत दुरंगी व तिरंगी सामने रंगणार आहेत. एकंदरीतच, तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त ऐन दिवाळीत राजकीय धुळवड रंगणार असून, स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात हरोलीत पंचायत समितीचे विद्यमान सभापती मनोहर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील; तर खरशिंगात माजी सदस्य बाळासाहेब कुमठेकर, सुहास पाटील यांच्यात रणसंग्राम आहे. बोरगावात माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात पुन्हा स्वगृही परतलेले माजी उपसभापती बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष गणेश पाटील, शिवसेनेचे मारुती पवार, तर राज्यमार्गावरील शिरढोणात घोरपडेसमर्थक जिल्हा परिषदेच्या सदस्या संगीता नलवडे, तात्यासाहेब नलवडे, संजय पाटील, भारतीय जनता पक्षाच्या माजी सभापती वैशाली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे टी. व्ही. पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर असल्याने येथेही तिरंगी सामन्यात चुरस असली तरी स्थानिक आघाडी आहे. मळणगावात विद्यमान पंचायत समितीच्या उपसभापती सरिता शिंदे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार सामना रंगणार आहे.

कुचीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील, पुंडलिक पाटील, बाबूराव सूर्यवंशी; तर पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, भाजपचे सरपंच लक्ष्मण पवार यांच्यात जोरदार चुरस आहे. आगळगावमध्ये ‘राष्ट्रवादी’चे माजी बांधकाम सभापती दत्ताजी पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाराणी पाटील व भाजपचे व्यंकटराव पाटील, अण्णासाहेब जाधव यांच्यात टशन आहे. सैनिकांचे गाव असलेल्या रांजणीत तिरंगी सामना रंगेल. ‘राष्ट्रवादी’चे नारायण पवार, कारखाना संचालक जीवनराव पवार यांच्यासह प्रमुख नेते एकत्रित असून, त्यांचा सामना उद्योगपती विजयराव कुलकर्णी यांच्यात रंगणार आहे. घाटनांद्रेत भाजपचे माजी उपसभापती अनिल शिंदे यांनी सत्ता पुन्हा राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत; तर ‘राष्ट्रवादी युवक’चे अमर शिंदे हेही तयारीत आहेत. वाघोलीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे व घोरपडे गटात लढत चुरशीची होणार आहे.

जाखापुरात शिवाजीराव बोराडे व स्थानिक आघाडीत लढत आहे. अलकूड (एम)मध्ये ज्येष्ठ नेते भानुदास पाटील यांनी सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे गाव असलेल्या कोंगनोळीत सहा जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागांसाठी निवडणूक आहे. कुकटोळीत घोरपडेसमर्थक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी यमगर, काँग्रेसचे संजय हजारे यांच्यात टशन आहे.

लंगरपेठ, शिंदेवाडी (हिं), हिंगणगाव, नागजमध्ये पुन्हा जोरदार टशन होण्याचे संकेत आहेत. आरेवाडीत ‘राष्ट्रवादी’चे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांच्या गावातही निवडणूक आहे. शेंडगे कुटुंबीयांवर जनतेने पुन्हा विश्वास दाखवत केरेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. निवडणुकीत स्थानिक आघाड्या होत असल्याने गटा-तटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यातच काँग्रेस, शिवसेना यांनीही स्वबळावर काही गावांत पॅनल उभे केले आहे; तर खासदार संजय पाटील गट, माजी मंत्री अजितराव घोरपडे गट, आमदार सुमन पाटील गट व सगरे गट असल्याने काही गावांत स्थानिक आघाड्या करीत निवडणुका लढविल्या जात आहेत.

दोन गावे बिनविरोध 
तालुक्‍यात खरशिंग, हिंगणगाव, शिंदेवाडी, कोंगनोळी, विठूरायाचीवाडी, लांडगेवाडी, आरेवाडी, अलकुड (एम), नागज, शिरढोण, सराटी, मळणगाव, आगळगाव, लंगरपेठ, रांजणी, चुडेखिंडी, लोणारवाडी, घाटनांद्रे, कुची, वाघोली, जाखापूर, हरोली, बोरगाव, कुकटोळी, जायगव्हाण, शेळकेवाडी, अलकुड (एस), ढालेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यातील केरेवाडी व लांडगेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

Web Title: Sangli News Grampanchayat Election